

करुण नायर आणि जितेश शर्मा हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळतात. या दोन्ही खेळाडूंनी विदर्भ संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. विदर्भ संघाने रणजी करंडक स्पर्धेत विजेतेपद, विजय हजारे करंडक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. तर या संघाने 2024-25 च्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता या दोन्ही फलंदाजांनी विदर्भ संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, नायर कर्नाटक संघाकडून खेळण्याची योजना आखत आहेत, तर जितेश बडोदा संघात सामील होणार असल्याचे समजते आहे.
करुण नायर हा 2024-25 च्या रणजी करंडक हंगामात विदर्भ संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने 9 सामन्यांमध्ये एकूण 863 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये चार शतकांचा समावेश होता. तर, विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत त्याने 779 धावा केल्या होत्या. नायरने 2023-24 पूर्वीच कर्नाटक संघ सोडला होता. ‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, नायर वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे कर्नाटक संघात परत येऊ इच्छित आहे.
गेल्या काही काळात विदर्भ संघाला मिळालेल्या यशामध्ये करुण नायरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दमदार फॉर्मच्या जोरावरच त्याचे 8 वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात त्याचा समावेश आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी 6 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 374 धावा केल्या आहेत आणि यामध्ये एका त्रिशतकाचाही समावेश आहे.
जितेश शर्मा बडोदा संघाकडून खेळणार आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत विदर्भाचे नेतृत्व केले होते आणि विजय हजारे करंडक स्पर्धेतही तो खेळला होता. यानंतर त्याने आयपीएलमध्ये आरसीबी (RCB) संघासाठी प्रभावी कामगिरी करत विजेतेपद मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लिस्ट-ए क्रिकेटमधील 56 सामन्यांमध्ये त्याने 1533 धावा केल्या होत्या, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 661 धावांची नोंद आहे.