

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.भारतात होणार्या या मालिकेसाठी आज ( दि.९) न्यूझीलंडने संघाची घोषणा केली. यामध्ये माजी कर्णधार केन विलियम्सन (kane williamson) याचा समावेश आहे. मात्र कंबरेच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या विल्यमसनच्या खेळण्याबाबत साशंकता कायम आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्याच्या नावाची घोषणा केली असली तरी पहिल्या कसोटीत तो खेळणार नाही, असे मानले जात आहे.
मागील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध गाले येथे झालेल्या कसोटी सामन्यात केन विलियम्सन याच्या मांडीला दुखापत झाली होती. आता त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे तो बंगळूरु येथे १६ ऑक्टोबरपासून सुरु होणार्या होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता नाही, न्यूझीलंड संघाचे निवडकर्ता सॅम वेल्स यांनी म्हटलं आहे की, आम्हाला वैद्यकीय संघाकडून मिळालेला सल्ला हा आहे की केनने दुखापत वाढवण्याचा धोका पत्करण्याऐवजी आता विश्रांती घ्यावी. त्यामुळे विल्यमसन मालिकेच्या अखेरीस पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या दारुण पराभवानंतर टीम साऊदीने न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद सोडले. भारत दौऱ्यावर टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करणार आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज सौदीने संघातील आपले स्थान कायम ठेवले आहे. फिरकी अष्टपैलू मायकेल ब्रेसवेल पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असेल, परंतु त्यानंतर मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतेल. पुणे आणि मुंबईतील उर्वरित सामन्यांमध्ये लेगस्पिनर ईश सोधी याला संधी मिळणार आहे.
भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ : टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ'रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, इश सोधी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत), टीम साऊदी,केन विलियम्सन, विल यंग.