

चेन्नई : एफआयएच पुरुष ज्युनिअर विश्वचषक विजेतेपदाने हुलकावणी दिलेला यजमान भारतीय हॉकी संघ बुधवारी (दि. 10) येथे होणाऱ्या कांस्यपदकाच्या लढतीत अर्जेंटिनाचे आव्हान मोडीत काढण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल. यापूर्वी, 2016 मध्ये लखनौ येथे अखेरचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारताला, रविवारी झालेल्या उपांत्य सामन्यात सातवेळच्या विजेत्या जर्मनीकडून 1-5 अशा मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. दरम्यान, बुधवारीच होणाऱ्या अंतिम लढतीत जर्मनी आठव्या विजेतेपदासाठी स्पेनचा सामना करेल.
भारतासाठी दोनवेळचा विजेता अर्जेंटिना संघ कडवे आव्हान असेल. त्यांनी या स्पर्धेत आपली क्षमता दाखवून दिली आहे. 2005 आणि 2021 मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या अर्जेंटिनाला स्पेनविरुद्धच्या अटीतटीच्या उपांत्य सामन्यात 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे तेदेखील स्पर्धेचा शेवट विजयाने करण्यासाठी उत्सुक आहेत.
उपांत्य सामन्यात तगड्या जर्मन संघासमोर भारतीय संघाचा अक्षरशः धुव्वा उडाला. यजमान संघ दबावाखाली कोलमडला. आता जर पोडियमवर स्थान मिळवायचे असेल, तर अर्जेंटिनाविरुद्ध अशा चुका करणे संघाला परवडणारे नाही. यापूर्वी जर्मनीविरुद्ध उपांत्य लढतीत भारताने प्रतिस्पर्ध्यांना सहज वर्चस्व गाजवू दिले.
वास्तविक, बेल्जियमला नमवल्याने भारतीय संघाकडून थोडाफार प्रतिकार जरूर अपेक्षित होता. मात्र, भारताने या निकषावर निराशा केली. दिलराज सिंग, अर्शदीप सिंग, सौरभ आनंद कुशवाह, गुरजोत सिंग आणि अजित यादव यांच्यासारख्या खेळाडूंना अनेकदा संधी मिळूनही त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. त्याची पुनरावृत्ती टाळता आली तर भारतीय संघ येथे विजयावर स्वार होऊ शकेल, असे चित्र आहे.
आतापर्यंतची वाटचाल पाहता, पेनल्टी कॉर्नर भारतासाठी कायमची डोकेदुखी ठरत आली आहेे. जर्मनीविरुद्ध अनमोल एक्काने पेनल्टी कॉर्नरवर भारताचा एकमेव गोल केला. मात्र, ड्रॅग-फ्लिकमधील भारताचा प्रमुख खेळाडू कर्णधार रोहित सेट-पिसेसवर प्रभावशाली खेळ साकारू शकला नाही. त्याच्या भक्कम बचावात्मक कौशल्याबद्दल शंका नसली, तरी भारताला त्याच्याकडून पेनल्टी कॉर्नरवर अधिक अपेक्षा आहेत.
जर्मनीविरुद्ध भारताला गेम प्लॅन प्रत्यक्षात साकारता आला नाही. तुम्ही 1-0 ने हरा किंवा 10-0 ने हरा, पराभव हा पराभव असतो. आपण गोल कसे स्वीकारले, त्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. प्रथम भक्कम बचाव करायला हवा आणि त्यानंतर आक्रमणावर भर देऊन गोलच्या संधी निर्माण कराव्या लागतात.
- भारताचे मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश
तिसऱ्या क्रमांकाची लढत : भारत वि. अर्जेंटिना, सायं. 5.30 वा.
फायनल : जर्मनी वि. स्पेन, रात्री 8 वा.