

लीडस् : इंग्लंडचा यष्टिरक्षक आणि टी-20 संघाचा कर्णधार जोस बटलरने टी-20 क्रिकेटमध्ये आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठत 13,000 धावांचा मैलाचा दगड पार केला आहे. लँकशायरकडून खेळताना यॉर्कशायरविरुद्धच्या व्हिटॅलिटी ब्लास्ट सामन्यात त्याने 46 चेंडूंमध्ये 77 धावा ठोकत हा विक्रम केला. या कामगिरीनंतर बटलर टी-20 क्रिकेटमध्ये 13,000 हून अधिक धावा करणारा केवळ सातवा फलंदाज ठरला आहे.
बटलरने आतापर्यंत 457 टी-20 सामन्यांमध्ये 431 डावांत 13,046 धावा केल्या असून त्याची सरासरी 35.74 आहे. यादरम्यान, त्याने 8 शतके व 93 अर्धशतके झळकावली असून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 124 आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये बटलर हा इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरतो. त्याच्या खात्यात 137 सामन्यांत 3,700 धावा आहेत. 2022 च्या टी-20 विश्वचषकात त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने विजेतेपद पटकावले होते.
आयपीएलमध्येही बटलरने 121 सामन्यांत 4,120 धावा केल्या असून सरासरी 40.00 आहे. त्याने सात शतके आणि 24 अर्धशतके ठोकले असून राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्याकडून खेळला आहे. टी-20 लीगमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे जोस बटलर हा आजच्या घडीचा सर्वात प्रभावशाली आणि यशस्वी टी-20 फलंदाजांपैकी एक ठरला आहे.
ख्रिस गेल : 14,562 धावा
किरोन पोलार्ड : 13,854 धावा
अॅलेक्स हेल्स : 13,814 धावा
शोएब मलिक : 13,571 धावा
विराट कोहली : 13,543 धावा
डेव्हिड वॉर्नर : 13,395 धावा