

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jos Buttler Resigned : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंड संघाची कामगिरी काही खास राहिली नाही. सलग दोन सामने गमावल्यानंतर इंग्लंड संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. आता खराब कामगिरीनंतर जोस बटलरने एकदिवसीय आणि टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (1 मार्च) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या ग्रुप सामन्यानंतर तो इंग्लिश संघाचा कर्णधार नसेल.
शुक्रवारी (28 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बटलरने याबाबत घोषणा केली. तो म्हणाला, ‘मी इंग्लंडच्या वनडे आणि टी-20 संघाचे कर्णधारपद सोडत आहे. हा माझ्यासाठी आणि संघासाठी योग्य निर्णय आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ई शेवटचे नेतृत्व करताना दिसेन. आशा आहे की कोणीतरी दुसरा या पदावर येईल आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्यासोबत चांगले काम करेल. संघ जिथे असायला हवा तिथे परत जाईल असा विश्वास आहे,’ अशी भावना बटलरने व्यक्त केली.
बटलर 2016 मध्ये पहिल्यांदा इंग्लंड संघाचा कर्णधार झाला. त्याने 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. या काळात इंग्लंडला फक्त 18 सामने जिंकता आले असून 25 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
बटलरने कर्णधार म्हणून 43 डावांमध्ये 35.69 च्या सरासरीने 1,392 धावा केल्या. यादरम्यान त्याने 1 शतक आणि १० अर्धशतके झळकावली. तो चार वेळा नाबाद राहिला.
बटलरने 2015 मध्ये पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व केले. त्याने 51 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. त्यापैकी 26 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. तर 22 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. 3 सामन्यांचा निकाल लागला नाही. कर्णधार म्हणून त्याने 48 डावांमध्ये 36.41 च्या सरासरीने आणि 151.89 च्या स्ट्राईक रेटने 1,566 धावा केल्या. बटलरच्या नेतृत्वाखालीच इंग्लंडने 2022 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता.
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापासून इंग्लंडची एकदिवसीय क्रिकेटमध्ये कामगिरी खराब राहिली. यामुळे बटलरवर बरीच टीका झाली. इंग्लंडने विश्वचषकात 9 पैकी फक्त 3 ग्रुप सामने जिंकले, ज्यामुळे स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर पडणारा तो पहिला संघ ठरला. यानंतर, संघाचा वाईट काळ सुरू झाला. गेल्या 25 पैकी 18 एकदिवसीय सामने त्यांनी गमावले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला.
जून 2022 मध्ये इयॉन मॉर्गन यांच्या जागी जोस बटलरला संघाचा कर्णधार बनवण्यात आले. या काळात काही स्पर्धांमध्ये संघाची कामगिरी उत्कृष्ट होती. पण 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो संघाला उपांत्य फेरीत पोहोचवू शकला नाही. ज्यामुळे तो खूप दुःखी झाला.
बटलरच्या नेतृत्वाखाली, इंग्लिश संघाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग सहा सामने गमावले. सप्टेंबर 2009 नंतर इंग्लंडने सलग सहा एकदिवसीय सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. इंग्लंडचा पराभवाचा सिलसिला नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांना ब्रिजटाऊन एकदिवसीय सामन्यात यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध आठ विकेटने पराभव पत्करावा लागला. यानंतर, इंग्लिश संघाला भारतीय भूमीवर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान व्यतिरिक्त इंग्लंडलाही ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.
बटलर म्हणाला की, मी इंग्लंडसाठी एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळत राहीन. मी इंग्लंडचे कर्णधारपद सोडणार आहे. हा माझ्यासाठी आणि संघासाठी योग्य निर्णय आहे. आशा आहे की दुसरा कोणीतरी मॅक्युलमसोबत येईल आणि संघाला जिथे असायला हवे तिथे घेऊन जाईल. अजूनही दुःख आणि निराशेची भावना आहे. मला खात्री आहे की कालांतराने हे सर्व निघून जाईल आणि मी माझ्या क्रिकेटचा आनंद घेऊ शकेन. इंग्लंद संघाचे नेतृत्व करणे हा मोठा सन्मान आहे. या प्रवासात अनेक खास गोष्टी जोडल्या गेल्या आहेत.’