

सिडनी : शेवटच्या ॲशेस कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जो रूटने झळकावलेले शानदार शतक आणि हॅरी ब्रूकच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने सर्वबाद 384 धावांपर्यंत जरूर मजल मारली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानेही 34.1 षटकांत 2 बाद 166 असे चोख प्रत्युत्तर दिले आहे. दिवसअखेर सलामीवीर ट्रॅव्हिस हेड 91 तर मायकल नेसर एका धावेवर नाबाद राहिले.
इंग्लंडने 3 बाद 211 या मागील धावसंख्येपासून सुरुवात केल्यानंतर यात आणखी जेमतेम 173 धावांची भर घातली. जो रूटने आपल्या नाबाद 72 धावांच्या खेळीचे रूपांतर 160 धावांच्या (242 चेंडू) विशाल खेळीत केले. ब्रिस्बेनमधील नाबाद 138 धावांनंतर या मालिकेतील रूटचे हे दुसरे शतक ठरले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे हे 41 वे शतक असून त्याने या निकषावर रिकी पाँटिंगशी बरोबरी साधली. रूटच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 384 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 2 बाद 166 धावा केल्या असून ते अद्याप 218 धावांनी पिछाडीवर आहेत.
तत्पूर्वी, इंग्लंडच्या डावातील पडझड आश्चर्यकारक ठरली. हॅरी ब्रूक आपल्या मागील धावसंख्येत केवळ सहा धावांची भर घालून 84 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्सला मिचेल स्टार्कने शून्यावर बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये स्टोक्सला बाद करण्याची स्टार्कची ही 14 वी वेळ ठरली.
ऑस्ट्रेलियाच्या डावात ट्रॅव्हिस हेडने 87 चेंडूंमध्ये नाबाद 91 धावांची खेळी करत या मालिकेतील आपले तिसरे अर्धशतक पूर्ण केले. हेडने लॅबुशेनसोबत (48 धावा) दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. लॅबुशेनला बेन स्टोक्सने गलीमध्ये झेलबाद करत ही जोडी फोडली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी काही प्रमाणात स्वैर मारा केल्याचा फायदा ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी उचलला. संघात पुनरागमन करणाऱ्या मॅथ्यू पॉटस्ने सात षटकांत 58 धावा बहाल केल्या.
इंग्लंड पहिला डाव : 97.3 षटकांत सर्वबाद 384 (जो रूट 242 चेंडूंत 15 चौकारांसह 160, हॅरी ब्रूक 97 चेंडूंत 6 चौकार, 1 षटकारासह 84, जेमी स्मिथ 76 चेंडूंत 46. मायकल नेसर 18.3 षटकांत 4/60).
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : 34.1 षटकांत 2 बाद 166. (ट्रॅव्हिस हेड 87 चेंडूंत 15 चौकारांसह नाबाद 91, मार्नस लॅबुशेन 68 चेंडूंत 7 चौकारांसह 48, मायकल नेसर नाबाद 1. बेन स्टोक्स 2/30).
24 : 2021 च्या सुरुवातीपासून जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत तब्बल 24 शतके झळकावलेली आहेत. आश्चर्य म्हणजे याच कालावधीत इतर कोणत्याही फलंदाजाला दहाहून अधिक शतके झळकावता आलेली नाहीत. हॅरी ब्रूक, केन विल्यम्सन, स्टीव्ह स्मिथ आणि शुभमन गिल हे प्रत्येकी दहा शतकांसह संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
26 : 2001 ते 2006 या 6 कॅलेंडर वर्षांच्या कालावधीत रिकी पाँटिंग आणि मॅथ्यू हेडन यांनी प्रत्येकी 26 शतके केली होती. यादरम्यान, रूटने 2021 ते 2026 या कालावधीत आतापर्यंत 24 शतके पूर्ण केली आहेत. 2026 हे वर्ष सुरू होऊन अवघा एक आठवडा झाला असून, रूटकडे पाँटिंग आणि हेडनचा विक्रम मोडण्यासाठी संपूर्ण वर्ष शिल्लक आहे.
17 : रूटने कसोटी क्रिकेटमध्ये 150 हून अधिक धावांच्या खेळींची संख्या आता 17 वर पोहोचली आहे. हा ऐतिहासिक विक्रम असून, तो सर्वाधिक 150+ धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर अशा 20 खेळींसह यात अव्वल स्थानी आहे.
7 : रूटने आतापर्यंत 7 वेगवेगळ्या देशांमध्ये 150 हून अधिक धावांच्या खेळी केल्या आहेत. केवळ सचिन तेंडुलकर आणि युनूस खान यांनी 8 वेगवेगळ्या देशांमध्ये हा पराक्रम केला आहे.
5 : गेल्या वर्षी लीडस् येथे भारताविरुद्ध चौथ्या डावात नाबाद 53 धावा केल्यापासून, रूटने सलग पाच वेळा 50 हून अधिक धावांच्या खेळींचे शतकांमध्ये रूपांतर केले आहे. अशी कामगिरी करण्याची रूटची ही पहिलीच वेळ आहे.
27 : ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने यंदाच्या ॲशेस मालिकेत आतापर्यंत एकूण 27 बळी (26 झेल आणि एक यष्टिचीत) टिपले आहेत. या निकषावर तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2013 च्या ॲशेसमध्ये ब्रॅड हॅडिनने 29, तर 1982-83 च्या ॲशेसमध्ये रॉड मार्शने 28 बळी घेतले होते.