पुढारी ऑनलाईन डेस्क : Joe Root Record : कसोटी क्रिकेट अधिक रोमांचक बनवण्यासाठी 2019 मध्ये ICC विश्व कसोटी चॅम्पियनशिप सुरू करण्यात आली. ज्याला काही लोक कसोटी क्रिकेटचा विश्वचषक देखील म्हणतात. गेल्या पाच वर्षांत या स्पर्धेत इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने धावांचा पाऊस पाडला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 5000 धावांचा टप्पा पार करणारा रूट हा पहिला फलंदाज ठरला आहे.
इंग्लिश संघ सध्या पाकिस्तान दौ-यावर आहे. उभय संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मुलतान क्रिकेट स्टेडियमवर मालिकेतील पहिला सामना रंगला आहे. या सामन्याच्या तिस-या दिवशी इंग्लंदच्या जो रुटने कसोटी कारकिर्दीतील 35 वे शतक पूर्ण केले. त्या पूर्वी तो खेळाच्या दुसऱ्या दिवशी 32 धावा करून नाबाद परतला होता. यादरम्याने त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पार केला. 27 धावा करताच त्याने हा विक्रम रचला. तिस-या दिवसाअखेर रुटच्या खात्यात 59 कसोटीच्या 107 डावांमध्ये 5116 धावा जमा झाल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 52.71 राहिली आहे. डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक शतके (17) आणि अर्धशतके (20)त्याच्याच नावावर आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-10 मध्ये फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा हा भारताचा एकमेव फलंदाज आहे. रूट आणि दुसऱ्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेमध्ये धावांचे मोठे अंतर आहे. लॅबुशेनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत एकूण 3904 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आहे. डब्ल्यूटीसीमध्ये त्याच्या खात्यात 3486 धावा आहेत. चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आहे. त्याने 3101 धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा माजी कसोटी कर्णधार बाबर आझम आहे. त्याने डब्ल्यूटीसीमध्ये आतापर्यंत 2755 धावा केल्या आहेत.
डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-10 फलंदाजांमध्ये चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आहे. टॉप-10 मध्ये त्यांचे चार फलंदाज आहेत. तर तीन इंग्लंडचे आणि भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी एक फलंदाज आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा 2686 धावांसह सहाव्या क्रमांकावर आहे. तर सातव्या स्थानावर इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्राउली आहे, ज्याच्या नावावर 2624 धावा आहेत. आठव्या क्रमांकावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आहे, ज्याने 34 कसोटी सामन्यांच्या 58 डावांमध्ये एकूण 2594 धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने 2558 धावांसह 9व्या क्रमांकावर आहे. तर 10व्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आहे. ज्याने 2510 धावा केल्या आहेत.
11व्या क्रमांकावर न्यूझीलंडचा माजी कसोटी कर्णधार केन विल्यमसन आहे. त्याने 2427 धावा आहेत. त्यानंतर 12व्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (2423), 13व्या क्रमांकावर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आहे. कोहलीने 38 कसोटी सामन्यांच्या 64 डावांमध्ये एकूण 2334 धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या ओली पोपचे नाव 14 व्या तर श्रीलंकेच्या धनंजय डी सिल्वाचे नाव 15 व्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत जो रूट आता सहाच्या स्थानावर पोहचला आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 51 शतकांसह पहिल्या स्थानी आहे. तर जॅक कॅलिस 45 शतकांसह दुस-या स्थानी आहे. त्यानंतर रिकी पाँटिंग (41) तिस-या, कुमार संगकारा (38) चौथ्या आणि राहुल द्रविड (36) पाचव्या क्रमांकावर आहेत. रुटने 2024 मध्ये आतापर्यंत 5 शतके झळकावली आहेत. या वर्षी सर्वाधिक शतके करणारा तो खेळाडू आहे.