

मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने नवा विक्रम रचला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 11 धावा करताच त्याने इतिहास रचला. अशी अद्वितीय कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर कसोटी सामना सुरू आहे. भारतीय संघ पहिल्या डावात 358 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, इंग्लंडने आक्रमक सुरुवात करत भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्रॉली यांनी पहिल्या गड्यासाठी 166 धावांची भागीदारी रचली. दोघांनाही आपले शतक पूर्ण करता आले नाही, परंतु त्यांनी इंग्लंडला एक दमदार सलामी दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 2 गडी गमावून 225 धावा केल्या होत्या. ओली पोप 20 आणि जो रूट 11 धावांवर नाबाद तंबूत परतले होते.
शुक्रवारी (दि.25) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या धावसंख्येत जास्तीत जास्त धावांची भर घालण्यासाठी ओली पोप आणि जो रूट मैदानात उतरले. यादरम्यान, रूटने असा विक्रम रचला, जो आजपर्यंत कोणालाही करता आलेला नाही. यासह त्याने मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. तिसऱ्या दिवशी आपल्या धावसंख्येत आणखी 11 धावांची भर घातल्यानंतर तो मँचेस्टरमध्ये 1000 कसोटी धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. रूटने मँचेस्टरमध्ये आतापर्यंत 12 कसोटी सामन्यांच्या 20 डावांमध्ये 60 हून अधिकच्या प्रभावी सरासरीने 1000 धावांचा टप्पा पूर्ण केला.
जो रूट : 1000*
बेन स्टोक्स : 579
जॉनी बेअरस्टो : 379
जोस बटलर : 365
झॅक क्रॉली : 322
ॲलिस्टर कुक : 316
याशिवाय, रूटने मँचेस्टर कसोटीत 31 धावा करताच कसोटी क्रिकेटमध्ये 13,290 धावांचा टप्पा गाठला. यासह तो कसोटीत सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यादरम्यान त्याने भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविड आणि द. आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस यांना एका झटक्यात मागे टाकले. या यादीत भारताचा सचिन तेंडुलकर पहिल्या, तर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग दुसऱ्या स्थानी आहे. या कामगिरीमुळे आधुनिक क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये त्याचे स्थान अधिकच भक्कम झाले आहे.
सचिन तेंडुलकर : 15921 धावा
रिकी पाँटिंग : 13378 धावा
जो रूट* : 13290 धावा
जॅक कॅलिस : 13289 धावा
राहुल द्रविड : 13288 धावा