

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jay Shah ICC New Chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नवे अध्यक्ष बनले आहेत. ते आता ग्रेग बार्कले यांची जागा घेतील. ICC चेअरमन पदासाठी अर्ज करणारे एकमेव अर्जदार जय शहा होते. अशा स्थितीत निवडणूक झाली नाही आणि शहा यांची बिनविरोध निवड झाली. अर्ज करण्याची शेवटची तारीख मंगळवार (27 ऑगस्ट) होती.
न्यूझीलंडचे विद्यमान आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यानंतर 1 डिसेंबर रोजी जय शहा आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव आहेत. आता बीसीसीआयला सचिव पदावर नवीन नियुक्ती करावी लागणार आहे. आयसीसीने याधीच 20 ऑगस्ट रोजी स्पष्ट केले होते की, बार्कले सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष होणार नाहीत. 2020 पासून ते या पदावर होते. नोव्हेंबरमध्ये ते आपले पद सोडणार आहेत.
आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मंगळवारी शेवटची तारीख होती. या पदासाठी जय शहा यांच्याशिवाय एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे शहा यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ते सध्या आयसीसीच्या वित्त आणि वाणिज्य उपसमितीचे अध्यक्ष आहेत.
जय शहा म्हणाले, ‘आयसीसीच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार. जागतिक स्तरावर क्रिकेटचा विकास करण्यासाठी मी काम करत राहीन. सध्या क्रिकेटच्या अनेक फॉरमॅटला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. मी क्रिकेटमध्ये नवीन तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न करेन. खेळ, तसेच मी विश्वचषक सारख्या कार्यक्रमांना जागतिक बाजारपेठेत नेईन. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश ही एक मोठी उपलब्धी आहे. आम्ही ऑलिम्पिकच्या माध्यमातून या खेळाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देऊ आणि हा खेळ अधिक देशांमध्ये नेण्याचा प्रयत्न करू.’