जसप्रीत बुमराह ठरला ICCचा सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू!

Jasprit Bumrah ICC Award : आयसीसीकडून पुरस्कार जाहीर
Jasprit Bumrah
जसप्रीत बुमराह Twitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Awards : भारताचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला 2024 चा सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे. त्याने इंग्लंडचा जो रूट, हॅरी ब्रुक आणि श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस यांना मागे टाकले. 2018 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या बुमराहने पहिल्यांदाच हा पुरस्कार जिंकला आहे. आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्कार जिंकणारा तो सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी राहुल द्रविड (2004), गौतम गंभीर (2009), वीरेंद्र सेहवाग (2010), रविचंद्रन अश्विन (2016) आणि विराट कोहली (2018) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अशाप्रकारे, 6 वर्षांनंतर हा पुरस्कार पुन्हा भारतीय खेळाडूला मिळाला आहे. बुमराहला हा सन्मान मिळाल्याने भारताने ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली. दोन्ही देशांच्या खेळाडूंनी प्रत्येकी 6-6 वेळा हा पुरस्कार पटकावला आहे. तसेच, कांगारू फलंदाज स्टीव्ह स्मिथ (2015, 2017) हा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने त्याच्या कारकिर्दीत दोनदा या पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे.

बुमराहने घेतल्या 71 कसोटी विकेट्स

गेल्या वर्षी बुमराहने आपल्या घातक गोलंदाजीने विरोधी संघांना धडकी भरवली. 2024 मध्ये त्याने 13 कसोटी सामन्यांमध्ये 14.92 च्या सरासरीने आणि 30.16 च्या स्ट्राईक रेटने 71 विकेट्स घेतल्या. गेल्या वर्षी तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने चार वेळा चार विकेट्स घेतल्या आणि पाच वेळा पाच विकेट्स घेण्याची किमया केली. उजव्या हाताच्या गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही कहर केला. त्याने पाच कसोटी सामन्यात 32 बळी घेतले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा 1-3 असा पराभव झाला पण 31 वर्षीय बुमराह मालिकावीर ठरला.

रूट, ब्रूक आणि मेंडिस मागे राहिले

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने गेल्या वर्षी 17 कसोटी सामन्यांमध्ये 55.57 च्या सरासरीने 1556 धावा केल्या, ज्यामध्ये सहा शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत पाचव्यांदा एका कॅलेंडर वर्षात 1000 धावांचा टप्पा ओलांडला. तो 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला. ब्रूकने 12 कसोटी सामन्यांमध्ये 55.00च्या सरासरीने 1100 धावा केल्या. त्याने चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली. तर श्रीलंकेच्या मेंडिसने 9 कसोटी सामन्यात 74.92 च्या सरासरीने 1049 धावा केल्या. यादरम्यान त्याने पाच शतके आणि तीन अर्धशतके झळकावली.

बुमराहसाठी ‘ही’ विकेट सर्वात खास

पुरस्कार जिंकल्यानंतर बुमराह म्हणाला, ‘आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. कसोटी फॉरमॅट नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहिला आहे. मला नेहमीच या फॉरमॅटमध्ये खेळायचे होते. अशा परिस्थितीत आयसीसीकडून हा सन्मान मिळणे ही अभिमानाची बाब आहे. मागचे वर्ष माझ्यासाठी खास राहिले. टीम इंडियाकडून खेळताना मोठी कामगिरी करता आली याचा आनंद आहे,’ अशी भावना त्याने व्यक्त केली.

बुमराहने इंग्लंडचा फलंदाज ऑली पोपची विकेट सर्वात खास असल्याचे म्हटले. विशाखापट्टणममध्ये बुमराहने धोकादायक यॉर्कर टाकून पोपला बाद केले होते. भारतीय गोलंदाज म्हणाला, ‘गेल्या वर्षी अनेक घेतल्या. त्याततील इंग्लंडच्या ओली पोपची विकेट खूप खास आहे. त्या विकेटमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. माझ्या संघाला त्याचा जबरदस्त फायदा झाला. ती बाब माझ्यासाठी खूप आनंदायी आहे.’

आयसीसीने म्हटले आहे की, ‘बुमराह 2024 मध्ये जगातील सर्वोत्तम गोलंदाज राहिला. त्याने देशांतर्गत आणि परदेशी दोन्ही परिस्थितीत उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला त्यांचे आव्हान जिवंत ठेवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news