

दुबई; वृत्तसंस्था : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत 879 गुणांसह आपले अव्वल स्थान यशस्वीरीत्या कायम राखले आहे. बुमराहनंतर मोहम्मद सिराज हा 12 व्या क्रमांकासह दुसरा सर्वोत्तम भारतीय गोलंदाज ठरला आहे. भारताचे फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव अनुक्रमे 14 व्या आणि 15 व्या स्थानावर आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने दुसरे आणि कर्णधार पॅट कमिन्सने चौथे स्थान पटकावले, तर न्यूझीलंडचा मॅट हेन्री तिसर्या क्रमांकावर पोहोचला आहे.
बुधवारी जाहीर झालेल्या या क्रमवारीत फलंदाजांमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट 880 गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल यांनी अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर झेप घेतली. इंग्लंडचा हॅरी ब्रूक दुसर्या स्थानावर असून, ऑस्ट्रेलियाचे ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ अनुक्रमे तिसर्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.