

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला बीसीसीआय विशेष पुरस्काराने सन्मानित करणार आहे. बुमराहची पुरुष गटातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर स्मृती मानधनाने महिला गटात हा पुरस्कार जिंकला आहे.
बुमराहने कौशल्य, अचूकता आणि सातत्य यांचा मिलाफ साधत गेल्या वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली. 2024 मधील या कामगिरीचे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही बक्षिस दिले. आयसीसीने त्याला 2024 मधील कसोटी आणि एकूणच वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडले.
बुमराहने टी-20 वर्ल्डकप तसेच इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मैदानावरील मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरीने सुरुवात केली. त्यानंतर अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात बुमराहने प्रभावी कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत 8.26 च्या सरासरीने 15 विकेट्स घेतल्या. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजेतेपद जिंकले. ज्यामध्ये बुमराहचे योगदान खूप महत्वाचे ठरले. बुमराहला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आले. बुमराहने नुकतेच कसोटीत 200 बळी पूर्ण केले. तो 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये 14.92 च्या सरासरीने आणि 30.16 च्या स्ट्राईक रेटने 71 विकेट्स घेतल्या.
31 वर्षीय हा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये मालिकावीर ठरला. त्याने पाच कसोटी सामन्यांमध्ये 32 विकेट्स घेतल्या.
28 वर्षीय स्मृती मानधाना ही आयसीसीची 2024 ची सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटू ठरली. तिने 2024 मध्ये सर्वाधिक 743 धावा केल्या. यादरम्यान तिने चार एकदिवसीय शतके फटकावली. महिला क्रिकेटच्या वनडे फॉरमॅटच्या वर्षातील सर्वाधिक शतकांचा हा विक्रम आहे. गेल्या वर्षी तिने 95 चौकार आणि सहा षटकार ठोकले. स्मृतीने एकदिवसीय सामन्यांमध्ये 57.86 च्या सरासरीने आणि 95.15 च्या प्रभावी स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.