

पॅरिस : इटलीच्या सारा इराणी आणि जास्मिन पाओलिनी या जोडीने फ्रेंच ओपन 2025 टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावत आपले पहिले ग्रँड स्लॅम जिंकले. रविवारी सायंकाळी रंगलेल्या अंतिम सामन्यात त्यांनी कझाकिस्तानची डॅनिलिना आणि सर्बियाची अलेक्सांड्रा क्रुनिच यांचा 6-4, 2-6, 6-1 असा पराभव केला. या विजयासह इराणी आणि पाओलिनी यांनी कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
रोलँड गॅरोसवरील अंतिम सामन्याची सुरुवात अत्यंत चुरशीची झाली. पहिल्या सेटमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार टक्कर पाहायला मिळाली, पण अखेरीस 5-4 अशा निर्णायक क्षणी ब्रेक मिळवत इराणी-पाओलिनी जोडीने पहिला सेट 6-4 असा जिंकला. दुसर्या सेटमध्ये मात्र डॅनिलिना आणि क्रुनिच यांनी उत्कृष्ट पुनरागमन करत इटालियन जोडीवर दबाव आणला आणि तो सेट 6-2 असा सहज जिंकला. त्यामुळे सामना तिसर्या आणि निर्णायक सेटमध्ये पोहोचला.
तिसर्या सेटमध्ये सारा-जास्मिन पाओलिनी यांनी आपला अनुभव आणि कौशल्याचा पुरेपूर वापर केला. त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत 5-0 अशी मोठी आघाडी घेतली. अखेरीस क्रुनिचचा फोरहँड नेटमध्ये गेल्याने इटालियन जोडीने हा सेट 6-1 असा जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, याच क्ले कोर्टवर या जोडीने गेल्या वर्षी पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले होते.
38 वर्षीय सारा इराणीसाठी ही स्पर्धा अविस्मरणीय ठरली. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यापूर्वी तिने इटलीच्याच आंद्रिया वावास्सोरीसोबत मिश्र दुहेरीचे विजेतेपदही पटकावले होते, ज्यामुळे तिने या स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवला. दुसरीकडे, जास्मिन पाओलिनीने गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या एकेरी आणि दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. यंदा एकेरीत चौथ्या फेरीत पराभूत होऊनही तिने दुहेरीतील कामगिरीने सर्वांना प्रभावित केले.