

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ १३ सप्टेंबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, संघाचे कर्णधारपद पुन्हा एकदा श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे. संघात वैभव सूर्यवंशीला पुन्हा स्थान मिळाले आहे, तर संजू सॅमसनचे पुनरागमन झाले आहे. संजू सॅमसनसह इशान किशनचीही यष्टीरक्षक म्हणून संघात निवड करण्यात आली आहे.
इशान किशन सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत मोठी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. २०२६ या वर्षात त्याने फलंदाजीत सातत्य राखले असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे केवळ इंग्लंडचा हॅरी ब्रूक असून त्याने यंदा १२०० हून अधिक धावा केल्या आहेत. आता २०२६ मध्ये हॅरी ब्रूकनंतर १००० धावांचा टप्पा ओलांडणारा दुसरा फलंदाज बनण्याच्या उंबरठ्यावर इशान उभा आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अवघ्या १४ धावा करताच इशान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०२६ या कॅलेंडर वर्षात १००० धावा पूर्ण करेल. एका कॅलेंडर वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम तो पहिल्यांदाच करणार आहे; यापूर्वी २०२२ मध्ये ८९३ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
२०२६ मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
हॅरी ब्रूक: १२१८
इशान किशन: ९८६
जो रूट: ९२७
डॅरिल मिचेल: ९१४
इशान किशन २०२६ या वर्षात तिन्ही फॉरमॅट मिळून सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने यंदा २८ सामन्यांतील २७ डावांमध्ये ३६.५१ च्या सरासरीने ९८६ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर २ शतके आणि १४ अर्धशतके नोंदवली गेली आहेत. या यादीत अन्य कोणताही भारतीय फलंदाज त्याच्या जवळपासही नाही. शुभमन गिल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे.
२०२६ मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे भारतीय फलंदाज:
इशान किशन: ९८६
शुभमन गिल: ७६१
श्रेयस अय्यर: ५३०
अभिषेक शर्मा: ५१४
शिवम दुबे: ४८८