IND vs PAK : १० चौकार, ३ षटकार... इशान किशनचा कोलंबोत 'रुद्रावतार'; मोडले अनेक दिग्गज विक्रम

Ishan Kishan fastest fifty Record : इशान किशनने आपल्या बॅटने पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली.
IND vs PAK : १० चौकार, ३ षटकार... इशान किशनचा कोलंबोत 'रुद्रावतार'; मोडले अनेक दिग्गज विक्रम
Published on
Updated on

कोलंबो : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकात रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला रंगला. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय सलामीवीर इशान किशनने आपल्या बॅटने पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. इशानने अवघ्या ४० चेंडूंत ७७ धावांची स्फोटक खेळी साकारली, ज्यात १० चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. इशानच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे ९ वे अर्धशतक ठरले. अखेर सईम अयुबने त्याला त्रिफळाचीत करून माघारी धाडले.

विश्वचषकातील सर्वात वेगवान अर्धशतक

यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने अवघ्या २७ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह, भारत-पाकिस्तान दरम्यानच्या टी-२० विश्वचषक इतिहासातील तो सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. तसेच, दोन्ही देशांमधील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विचार करता, हे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. ७७ धावांच्या या खेळीसह इशानने दोन्ही देशांमधील टी-२० सामन्यातील चौथ्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येची नोंद केली. या बाबतीत त्याने गौतम गंभीरला मागे टाकले आहे.

भारत-पाक टी-२० मध्ये सर्वात वेगवान अर्धशतके

  • २३ चेंडू : मोहम्मद हाफिज (अहमदाबाद, २०१२)

  • २४ चेंडू : अभिषेक शर्मा (दुबई, २०२५)

  • २७ चेंडू : इशान किशन (कोलंबो आरपीएस, २०२६)

  • २९ चेंडू : युवराज सिंह (अहमदाबाद, २०१२)

भारत-पाक टी-२० मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या:

  • ८२* विराट कोहली (मेलबर्न, २०२२)

  • ७९* मोहम्मद रिझवान (दुबई, २०२१)

  • ७८* विराट कोहली (कोलंबो, २०१२)

  • ७७ इशान किशन (कोलंबो, २०२६)

  • ७५ गौतम गंभीर (जोहानिसबर्ग, २००७)

अवघड खेळपट्टीवर 'एकला चलो रे'चा बाणा

भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली होती. अवघ्या १ धावेवर अभिषेक शर्माच्या रूपाने भारताने पहिला बळी गमावला. मात्र, त्यानंतर इशान किशनने टिळक वर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. विशेष म्हणजे, जेव्हा इशान बाद झाला तेव्हा भारताची एकूण धावसंख्या ८८ होती, ज्यातील तब्बल ७७ धावा एकट्या इशानच्या होत्या. यावरून खेळपट्टी आव्हानात्मक असूनही इशानने पाकिस्तानी गोलंदाजांवर कशा प्रकारे वर्चस्व गाजवले, हे स्पष्ट होते.

विश्वचषकात इशानची विजयी घोडदौड

सध्याच्या टी-२० विश्वचषकात इशान किशन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत ३ डावांत ५२.६६ च्या सरासरीने आणि १७९.५६ च्या स्ट्राइक रेटने १५८ धावा कुटल्या आहेत. त्याने नामीबियाविरुद्ध ६१ धावांची वादळी खेळी केली होती, तर अमेरिकेविरुद्ध २० धावांचे योगदान दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news