

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी (दि. १) पुरुषांची ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये फलंदाजांच्या यादीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशनने धमाकेदार कामगिरीच्या जोरावर टी२० क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने त्याचाच संघ सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत नंबर-१ चा मुकुट आपल्या नावावर केला.
सध्या ईशान किशनच्या खात्यात ८७६ रेटिंग गुण असून अभिषेक शर्मा ८६९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. आता या दोन भारतीय फलंदाजांमध्ये केवळ ७ रेटिंगचा फरक असून, टी२० क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व यातून स्पष्ट होते. असे असले तरी गेल्या जवळपास १२ महिन्यांपासून अव्वल स्थानावर राज्य करणाऱ्या अभिषेकच्या सिंहासनाला ईशानने अवघ्या ६ महिन्यांत सुरुंग लावल्याचे पहायला मिळाले आहे.
भारतीय संघातून जवळपास दोन वर्षे बाहेर राहिल्यानंतर ईशान किशनने या वर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. या कमबॅकनंतर त्याने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली. नुकत्याच झालेल्या आयर्लंड दौऱ्यावर मात्र त्याला विशेष कामगिरी करता आली नाही; त्याने दोन सामन्यांत अनुक्रमे १ आणि १२ धावा केल्या. दुसरीकडे, अभिषेक शर्माने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ४९ धावांची खेळी केली होती, परंतु दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर (गोल्डन डक) बाद झाला. या मालिकेत भारताला ०-२ अशा लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.
परंतु, आयर्लंड मालिकेपूर्वी झालेल्या टी२० विश्वचषकात ईशान किशनने धडाकेबाज फलंदाजी केली होती. या विश्वचषकात त्याने जवळपास २०० च्या स्ट्राइक रेटने ३१७ धावा कुटल्या. कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या मॅच-विनिंग खेळीसाठी त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' म्हणूनही गौरवण्यात आले होते. याच बहारदार फॉर्मच्या जोरावर त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंगची कमाई करत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे.
या ऐतिहासिक कामगिरीसह ईशान किशन एका खास क्लबमध्ये सामील झाला आहे. आयसीसी टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारा तो भारताचा चौथा पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी केवळ विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांनीच हा पराक्रम केला होता.
दरम्यान, सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघातून बाहेर असून त्याचे कर्णधारपदही गेले आहे; ताज्या क्रमवारीत तो एका स्थानाने घसरून आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या टॉप-१० फलंदाजांमध्ये चार भारतीय खेळाडूंचा समावेश असून, दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तिलक वर्मा सहाव्या स्थानावर कायम आहे. तर पाकिस्तानचा साहिबजादा फरहान तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर ऑलराउंडर्स आणि गोलंदाजांच्या क्रमवारीतही बरेच बदल झाले आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने तीन स्थानांची झेप घेत सातवे स्थान गाठले आहे. आयर्लंडच्या गॅरेथ डेलानीने २४ वे आणि हॅरी टेक्टरने ३८ वे स्थान पटकावले आहे. झिम्बाब्वेचा सिकंदर रझा अद्यापही जगातील नंबर-१ ऑलराउंडर आहे.
गोलंदाजांच्या यादीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान अव्वल स्थानी कायम आहे. भारताविरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या आयर्लंडच्या खेळाडूंनाही या क्रमवारीत फायदा झाला आहे. आयर्लंडचा फलंदाज लॉर्कन टकर ७७ व्या तर रॉस अडायर ८४ व्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच, मालिकेत ४ बळी घेणारा आयर्लंडचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू हम्फ्रीज २५ व्या स्थानावर पोहोचला असून, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीतही मोठे बदल पाहायला मिळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेड पहिल्यांदाच जगातील नंबर-१ कसोटी फलंदाज बनला आहे. या बदलामुळे इंग्लंडचा हॅरी ब्रूक दुसऱ्या तर जो रूट तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
तसेच, कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या जसप्रीत बुमराहने आपले वर्चस्व सिद्ध करत पुन्हा एकदा अव्वल स्थान (नंबर-१) काबीज केले आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
नॉटिंगहॅम कसोटीतील विजयानंतर न्यूझीलंडच्या अनेक खेळाडूंना क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. रचिन रवींद्र सातव्या, डॅरिल मिचेल ११ व्या, डेव्हॉन कॉनवे १५ व्या आणि टॉम लॅथम ३१ व्या स्थानावर पोहोचले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर शमार जोसेफ संयुक्त १४ व्या आणि केमार रोच १७ व्या स्थानावर पोहोचले आहेत.