Virat Kohli
नवी दिल्ली: माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने स्टार फलंदाज विराट कोहलीच्या फलंदाजीवर केलेल्या टीकेला अखेर प्रत्युत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर विराटने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून घेतलेल्या निवृत्तीबद्दल पठाणने केलेल्या टिप्पणीमुळे त्याच्यावर टीका होत होती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शतक झळकावूनही, कोहलीला त्या मालिकेत ९ डावांमध्ये केवळ १९० धावा करता आल्या होत्या.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड होण्यापूर्वीच कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या कसोटी क्रिकेटमधील फॉर्ममध्ये झालेली घसरण स्पष्ट दिसत असतानाच हा निर्णय घेण्यात आला होता. कोहली वारंवार स्लिपमध्ये किंवा यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद होत होता, ज्यामुळे त्याच्या अडचणी स्पष्ट दिसत होत्या. पठाण म्हणाला, "तुम्ही माझे सोशल मीडिया पाहिल्यास, २०१९-२० मध्ये विराट कोहलीच्या फॉर्ममध्ये घसरण झाली होती. त्यावेळी असे म्हटले जात होते की तो कोरोनाचा काळ होता आणि त्याला प्रेरणा मिळत नव्हती. मला वाटले की जेव्हा एखादा मोठा खेळाडू पहिल्यांदाच अशा खराब फॉर्ममधून जातो, तेव्हा त्याला पाठिंबा दिला पाहिजे. तुम्ही माझे सोशल मीडिया पाहिल्यास, मी त्याला खूप पाठिंबा दिला होता. एक तर तो त्यासाठी पात्र होता आणि त्याने अनेक सामने जिंकून दिले होते. पण जर ५ वर्षे खराब फॉर्म असेल तर योग्य नाही."
"सरतेशेवटी, संघ नेहमीच सर्वोच्च स्थानी असायला हवा. संघ क्रमांक १ आहे; आपण संघासाठी खेळतो, सामने जिंकण्यासाठी खेळतो. जर एखादा फलंदाज सतत एकाच पद्धतीने बाद होत असेल, तर विरोधी संघ त्यानुसारच योजना आखतो. ते 'प्लॅन बी'कडे जाणार नाहीत. ते तुम्हाला 'प्लॅन ए' वापरूनच बाद करतील. जर तुम्ही चॅम्पियन खेळाडू असाल, तर तुम्हाला त्यांना 'प्लॅन ए' वरून 'प्लॅन बी' कडे जाण्यास भाग पाडले पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये विराटची अडचण हीच होती की तो वारंवार एकाच पद्धतीने बाद होत होता. याचा अर्थ तो एक वाईट खेळाडू आहे अस नाही; तो एक चॅम्पियन खेळाडू आहे, पण असे घडत होते. तुम्हाला जे दिसत आहे ते सविस्तरपणे समजावून सांगावेच लागेल," असेही पठाण म्हणाला.
इरफान पठाणने आपली समालोचक म्हणूनची भूमिका देखील स्पष्ट केली. तो म्हणाला,
“समालोचक म्हणून माझी जबाबदारी चाहत्यांशी आहे, खेळाडूंशी नाही. सामना पाहणाऱ्या चाहत्यांना खरं काय घडतंय, का घडतंय, पुढे काय घडू शकतं याचं स्पष्ट चित्र सांगणं ही आमची जबाबदारी आहे. खेळाडू चांगलं खेळत असेल तर कौतुक करायचं आणि तो अपयशी ठरत असेल तर टीका करणं ही आमची जबाबदारी आहे.”