

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2025 च्या कॉमेंट्री पॅनलमध्ये माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणचा समावेश करण्यात आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इरफानने कॉमेंट्रीदरम्यान काही खेळाडूंबद्दल आक्रमक टिप्पणी केली होती, ज्यामुळे प्रसारक आणि बीसीसीआय नाराज झाले. या वर्तनाचा इरफानला फटका बसला. त्याला आयपीएल 2025 च्या कॉमेंट्री पॅनलमधून वगळण्यात आले. (irfan pathan commentary controversy)
इरफान आयपीएल व्यतिरिक्त इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देखील कॉमेंट्री करायचा. आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वीच कॉमेंट्री पॅनलची घोषणा करण्यात आली होती, मात्र इरफानला त्यात स्थान मिळाले नाही.
एका रिपोर्टनुसार, काही भारतीय क्रिकेटर्सनी इरफान पठाण याच्याविरोधात तक्रार केली होती. तो चुकीच्या पद्धतीने खेळाडूंच्या कामगिरीवर भाष्य करतो, लाइव्ह कॉमेंट्रीदरम्यान काही खेळाडूंसोबत वैयक्तिक अजेंडा रेटतो आणि त्यांच्यावर निशाणा साधतो, असा आरोपही संबधीत खेळाडूंनी केला होता. यामुळेच इरफानला आयपीएल 2025 च्या कॉमेंट्री पॅनलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
इरफान पठाणने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्याची कॉमेंट्री पॅनलमधील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडेच या प्रकरणावर बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘काही वर्षांपूर्वी पठाणचा काही खेळाडूंशी वाद झाला होता. तेव्हापासून, तो त्याचा आक्रमकपणे उल्लेख करण्यास मागेपुढे पाहत नव्हता,’ असे म्हटले होते.
दरम्यान, इरफानने अलीकडेच त्याचे नवीन यूट्यूब चॅनल ‘सिधी बात विथ इरफान पठाण’ लाँच केले आहे. यावर तो सामन्यांचे तपशीलवार विश्लेषण करत आहे.
यापूर्वी, 2020 मध्ये संजय मांजरेकर यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारताच्या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने समालोचन पॅनेलमधून काढून टाकले होते तेव्हा त्यांच्यावरही बंदी घालण्यात आली होती. 2019 मध्ये झालेल्या अनेक वादग्रस्त घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये सहकारी समालोचक हर्षा भोगले यांच्याशी झालेला वाद, सौरव गांगुलीवर टीका करणे आणि अष्टपैलू रवींद्र जडेजावर टीप्पणी करणे यांचा समावेश होता.