

मुंबई : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे पश्चिम आशियातील देशांतील परिस्थिती बदलू लागली आहे. कच्च्या तेलासह पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. याचा थेट फटका भारतासह जगातील अनेक देशांना बसत असून, भारतात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. येत्या 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या ‘आयपीएल 2026’च्या आयोजनावर या टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. एलपीजीच्या टंचाईचा फटका स्पर्धेतील खेळाडूंसह प्रेक्षकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या संभाव्य इंधनटंचाईच्या परिस्थितीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) बारीक लक्ष ठेवून आहे.
‘आयपीएल’ स्पर्धेदरम्यान 10 संघ विविध शहरांत प्रवास करतात आणि दोन महिन्यांहून अधिक काळ हॉटेलमध्ये मुक्काम करतात. हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्राला कमर्शियल एलपीजी पुरवठा करण्यात अडचणी येत असल्याने, खेळाडूंची सोय आणि सामन्यांच्या वेळी चाहत्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याविषयी ‘आयपीएल’ गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केले आहे की, ‘बीसीसीआय’ सध्या परिस्थितीचे मूल्यांकन करत आहे. ‘ही एक गंभीर बाब आहे. परंतु, आतापर्यंत आम्हाला हॉटेल्सकडून कोणतीही अधिकृत तक्रार मिळालेली नाही. परिस्थिती बिघडल्यास आम्ही पर्यायी मार्गांचा विचार करू,’ असे त्यांनी सांगितले.
एलपीजीचा तुटवडा टाळण्यासाठी केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत निर्देश जारी केले आहेत. घरगुती वापराच्या एलपीजीला प्राधान्य दिले जात असून, व्यावसायिक पुरवठ्यासाठी तज्ज्ञांची एक समिती गठीत करण्यात आली आहे.
भारताची सुमारे 85-90 टक्के नैसर्गिक वायू आणि एलपीजी आयात होरमुझची सामुद्रधुनी मार्गावरून होते, जो सध्या इराण-इस्रायल संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. या टंचाईमुळे मुंबई आणि बंगळूरसारख्या शहरांतील अनेक रेस्टॉरंटस्ना आपला व्यवसाय बंद करावा लागला आहे किंवा मेन्यूमध्ये कपात करावी लागली आहे. ‘बीसीसीआय’ या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, स्पर्धेच्या आयोजनात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक : ‘आयपीएल 2026’चे वेळापत्रक अद्याप पूर्णपणे जाहीर झालेले नाही. मात्र, ‘बीसीसीआय’ने पहिल्या 20 दिवसांच्या सामन्यांची घोषणा गुरुवार (दि. 12) मार्चपर्यंत करण्याचे संकेत दिले आहेत. स्पर्धा 28 मार्च ते 31 मे या कालावधीत नियोजित आहे.