

इंग्लंडमधील स्पर्धेसाठी रवाना होण्याची सिंधूच्या टीमला प्रतीक्षा
सिंधूसह सर्व पथकाला सुरक्षित स्थानी हलवण्यासाठी भारतीय दूतावासाचा पुढाकार
दुबई : आमचे विमान दुबईत लँड झाले आणि त्यानंतर काही वेळातच हवाई हद्द बंद करत असल्याची घोषणा झाली. डोक्यावरून क्षेपणास्त्र डागली जात असल्याचा आवाज येत होता. त्यानंतर आम्ही जिथे थांबलो होतो, त्याच्या अगदी जवळच भीषण स्फोट झाला. माझे प्रशिक्षक इर्वानश्या तर स्फोटाच्या ठिकाणापासून अगदी 100 मीटर अंतरावर होते. धावतपळतच त्यांना सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली... हे उद्गार आहेत दस्तुरखुद्द भारतीय बॅडमिंटनतारका पी. व्ही. सिंधू हिचे.
दुबईत जे प्रवासी अडकले, त्यात सिंधूचाही प्राधान्याने समावेश असल्याचे यापूर्वीच अधोरेखित झाले असून आपण सुरक्षित असल्याचे तिने सोशल मीडियावरून नमूद केले. तसेच यावेळी दुबईतील तणावग्रस्त वातावरण नेमके कसे आहे, याचाही उल्लेख केला.
प्रशिक्षक इर्वानश्या यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. विमानतळावर स्फोट झाल्यामुळे आम्ही सध्या हॉटेलमध्ये अडकून पडलो आहोत. आम्ही सुरक्षित असलो तरी मनात धाकधूक आहे. बुधवारी सिंधूचा सामना आहे, त्यामुळे आम्हाला आजच येथून बाहेर पडता येईल, अशी आशा आहे, असे त्यांनी नमूद केले. 3 मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी सिंधू सध्या दुबईतून बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत आहे.
विमानतळ प्रशासन आणि दुबईतील भारतीय उच्चायुक्तालयाने प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलली आहेत. सिंधू आणि तिच्या चमूला सुरक्षित स्थानी हलवण्यात आले असून, तिने भारतीय दूतावासाचे आभार मानले आहेत. दुबई प्रशासन आणि भारतीय दूतावासाच्या मदतीने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, परिस्थिती निवळण्याची ते प्रतीक्षा करत आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने आपली अनेक उड्डाणे रद्द केली असून, प्रवाशांना विमानतळाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यांमुळे आखाती देशांमधील परिस्थिती चिघळली आहे. यामुळे या भागातील हवाई हद्द बंद करण्यात आली असून दुबई विमानतळावरील सर्व ऑपरेशन्स अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. एअर इंडियाने दुबई, अबुधाबी, दोहा आणि तेल अवीवसह अनेक शहरांची उड्डाणे रद्द केली आहेत.
3 मार्चपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड स्पर्धेत सिंधू सहभागी होणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती आणि विमानसेवा ठप्प असल्याने ती वेळेत लंडनला पोहोचणार का, याबाबतही उशिरापर्यंत अनिश्चिततेचे वातावरण होते.