पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL Retention : आयपीएल 2025 साठी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे, गुरुवारी सर्व 10 फ्रँचायझींनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची घोषणा केली. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने 31 ऑक्टोबर ही फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम मुदत दिली होती. चेन्नई सुपर किंग्ज (CSK)ने नेहमीप्रमाणे त्यांचा स्टार खेळाडू एमएस धोनीला तर मुंबई इंडियन्स (MI)ने रोहित शर्माला रिटेन ठेवले आहे. हे दोघे खेळाडू लिलावाचा भाग नसतील.
मुंबईने पाचही कॅप्ड खेळाडूंना रिटेन ठेवले आहे. त्यांनी जसप्रीत बुमराहला 18 कोटी रुपयांमध्ये रिटेन ठेवले आहे. त्याच वेळी, फ्रँचायझीने सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याला 16.35-16.35 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. मुंबईने रोहितला 16.30 कोटींमध्ये रिटेन केले आहे. तर, तिलक वर्मा यांना फ्रँचायझीने 8 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.
चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने ऋतुराज गायकवाड (18 कोटी), मथिशा पाथिराना (13 कोटी), शिवम दुबे (12 कोटी), रवींद्र जडेजा (18 कोटी) आणि महेंद्रसिंग धोनी (4 कोटी) यांना रिटेन ठेवले आहे. धोनीचा अनकॅप्ड खेळाडूच्या यादीत समावेश आहे.
सनरायझर्स हैदराबादने (SRH) आपला कर्णधार पॅट कमिन्सला (18 कोटी रुपये) रिटेन ठेवले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली एसआरएच संघ गेल्या मोसमात उपविजेता ठरला होता. कमिन्ससह, एसआरएचने अभिषेक शर्मा (14 कोटी), हेनरिक क्लासेन (23 कोटी), नितीश रेड्डी (6 कोटी) आणि ट्रॅव्हिस हेड (14 कोटी) यांनाही रिटेन ठेवले आहे. दुसरीकडे, एसआरएचने आपला अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला रिलीज केले आहे.
कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) रिंकू सिंगला (13 कोटी रुपये) रिटेन ठेवले आहे. यासोबतच वरुण चक्रवर्ती (12 कोटी), सुनील नरेन (12 कोटी), आंद्रे रसेल (12 कोटी), हर्षित राणा (4 कोटी) आणि रमणदीप सिंग (4 कोटी) यांनाही रिटेन ठेवले आहे. 2024 च्या आयपीएलमध्ये संघाला चॅम्पियन बनवणा-या कर्णधार श्रेयस अय्यरला फ्रँचायझीने रिलीज केले आहे. तो आता मेगा ऑक़्शनमध्ये दिसेल.
राजस्थान रॉयल्सने (RR) त्यांचा कर्णधार संजू सॅमसनला (18 कोटी रुपये) रिटेन ठेवले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने गेल्या हंगामात चांगली कामगिरी केली होती. सॅमसन व्यतिरिक्त, संघाने यशस्वी जैस्वाल (18 कोटी), रियान पराग (14 कोटी), शिमरॉन हेटमायर (11 कोटी), ध्रुव जुरेल (14 कोटी) आणि संदीप शर्मा (4 कोटी) यांनाही रिटेन ठेवले आहे.
गुजरात टायटन्सने (GT) राशिद खानला (18 कोटी रुपये) कायम ठेवले आहे. यासोबतच जीटीने शुभमन गिल (16.5 कोटी) आणि साई सुदर्शन (8.5 कोटी) यांनाही रिटेन ठेवले आहे. राहुल तेवतिया (4 कोटी रुपये) आणि शाहरुख खान (4 कोटी रुपये) देखील संघासोबत राहतील. हे दोन्ही खेळाडू अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघाशी जोडले गेले आहेत.
विराट कोहली पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळताना दिसणार आहे. पहिल्या सत्रापासून आरसीबीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोहलीला आरसीबीने कायम ठेवले आहे. त्याच्यासह यश दयाल आणि रजत पाटीदार यांनाही आरसीबीने कायम ठेवले आहे.
पंजाब किंग्जने (PBKS) शशांक सिंग (5.5 कोटी रुपये) आणि प्रभसिमरन सिंग (4 कोटी) यांना कायम ठेवले आहे. तर अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, सॅम कुरान, जितेश शर्मा, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांसारख्या मोठ्या खेळाडूंना रिलीज केले आहे.
लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) ने निकोलस पूरन (21 कोटी रिपये) याला रिटेन ठेवले आहे. यासोबतच एलएसजीने रवी बिश्नोई (11 कोटी), मयंक यादव (11 कोटी), मोहसिन खान (4 कोटी) आणि आयुष बडोनी (4 कोटी रुपये) यांनाही रिटेन ठेवले आहे. केएल राहुलने फ्रँचायझीशी संबंध तोडले असून हा खेळाडू नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मेगा ऑक़्शनमध्ये दिसणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सने (DC) अक्षर पटेलला (16.5 कोटी रुपये) रिटेन ठेवले आहे. यासह यादीत कुलदीप यादव (13.25 कोटी), ट्रिस्टन स्टब्स (10 कोटी) आणि अभिषेक पोरेल (रु. 4 कोटी) यांच्या नावाचा समावेश आहे. डीसीने सर्वांना चकित करत ऋषभ पंतला रिलीज केले आहे. आता तो नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मेगा ऑक़्शनमध्ये लिलावात दिसेल.