IPL Playoff Scenario : प्ले-ऑफच्या शर्यतीत चुरस वाढली; RCB ठरणार KKR वर भारी?, दोन्ही संघांसाठी विजय अनिवार्य

‘RCB’ची फलंदाजी विरुद्ध ‌‘KKR’ची गोलंदाजी असा रंगणार सामना
IPL Playoff Scenario : प्ले-ऑफच्या शर्यतीत चुरस वाढली; RCB  ठरणार KKR वर भारी?, दोन्ही संघांसाठी विजय अनिवार्य
Published on
Updated on

रायपूर : ‌‘आयपीएल‌’च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान असणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (आरसीबी) संघ आज (दि. 13) ‌‘केकेआर‌’विरुद्ध मैदानात उतरेल, त्यावेळी आपले स्थान आणखी भक्कम करणे, हेच त्यांचे मुख्य लक्ष्य असणार आहे. ‌‘आरसीबी‌’ची फलंदाजी व ‌‘केकेआर‌’ची गोलंदाजी असा हा सामना रंगणे अपेक्षित आहे.

अव्वल स्थानासाठी धडपड

सध्या ‌‘आरसीबी‌’चा संघ 14 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहे. मात्र, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स हे देखील तोडीस तोड कामगिरी करत असल्याने ‌‘आरसीबी‌’ला अर्थातच दक्ष राहावे लागेल. या तांत्रिक फेरबदलापेक्षा ‌‘आरसीबी‌’ व्यवस्थापनाचे मुख्य लक्ष आपल्या फलंदाजांच्या कामगिरीवर आहे.

फलंदाजीबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मागील सामन्यात ‌‘आरसीबी‌’ची फलंदाजी काहीशी फिकी पडली होती. 167 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. आता कर्णधार रजत पाटीदारची बॅट तळपणेदेखील या संघासाठी विशेष महत्त्वाचे असेल. स्पर्धेच्या सुरुवातीला षटकारांचा पाऊस पाडणारा हा फलंदाज सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. गेल्या सहा डावांमध्ये त्याने केवळ एक अर्धशतक आणि एकदाच 20 हून अधिक धावा केल्या आहेत. देवदत्त पडिक्कल आणि टीम डेव्हिड यांनी आपल्या छोट्या पण महत्त्वपूर्ण योगदानामुळे संघाला सावरले आहे.

‌‘केकेआर‌’साठी कर्णधार अजिंक्य रहाणेला अद्याप सूर गवसलेला नाही. परंतु, रिंकू सिंग, फिन ॲलन आणि अंग्रिश रघुवंशी यांनी फलंदाजीची धुरा सांभाळली आहे. तसेच, कॅमेरून ग्रीनच्या कामगिरीत झालेली सुधारणा कोलकात्यासाठी जमेची बाजू ठरत आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोलकात्याला हा विजयरथ कायम राखणे अनिवार्य आहे.

‌‘मिस्ट्री‌’ फिरकीचे आव्हान

बेंगळुरूच्या फलंदाजांसमोर सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांसारख्या अनुभवी ‌‘मिस्ट्री‌’ फिरकीपटूंचे कडवे आव्हान असेल. त्यांना कार्तिक त्यागी, वैभव अरोरा आणि अनुकूल रॉय यांसारख्या गोलंदाजांची साथ मिळत आहे. सुरुवातीच्या अपयशानंतर कोलकात्याने सलग चार सामने जिंकून जोरदार पुनरागमन केले आहे.

‌‘केकेआर‌’ आठव्या क्रमांकावर

रायपूरची खेळपट्टी जर मागील सामन्याप्रमाणेच मंद राहिली, तर ‌‘आरसीबी‌’च्या फलंदाजांची कसोटी लागेल. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स 10 सामन्यांत 9 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. या सामन्यातील पराभव त्यांना स्पर्धेतून बाहेर ढकलण्यासाठी पुरेसा ठरेल. ‌‘केकेआर‌’च्या फलंदाजांना ‌‘आरसीबी‌’च्या भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांसारख्या भेदक वेगवान गोलंदाजांचा यशस्वी सामना करावा लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news