

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL Records : क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये फलंदाजांची भागीदारी महत्त्वाची असते. भागीदारीमुळेच संघ मोठा खेळ करू शकतो. जेव्हा मोठी भागीदारी होते तेव्हा गोलंदाजी संघावर दबाव वाढतो. आयपीएलही याला अपवाद नाही. आयपीएलच्या इतिहासात अशा टॉप-5 जोड्या आहेत ज्यांनी मिळून हजारो धावा केल्या आहेत, पण यंदा एकही जोडी पुन्हा मैदानावर दिसणार नाही. पण त्यांची कामगिरी लीगच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांमध्ये कोरल्या गेल्या आहेत. चला जाणून घेऊया आकडेवारी.
आयपीएलमध्ये भागीदारीत सर्वाधिक धावा जोडण्याचा विक्रम विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांच्या नावावर आहे. 2020 मध्ये ही जोडी शेवटची एकत्र खेळली होती. 76 डावांमध्ये विराट आणि डिविलियर्स यांनी 44 च्या सरासरीने 3123 धावा जोडल्या आहेत. त्यांची सर्वात मोठी भागीदारी 229 धावांची आहे.
2011 ते 2017 या कालावधीत विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची जोडी आयपीएलमध्ये चमकदार ठरली. केवळ 59 डावांमध्ये या दोघांनी 52.58 च्या सरासरीने 2787 धावा केल्या. या जोडीने 204 धावांची नाबाद भागीदारी देखील केली आहे, जी आयपीएलमधील सर्वोत्तम भागीदाऱ्यांपैकी एक आहे. मात्र, त्यांच्या दमदार कामगिरीनंतरही रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही.
शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर या डावखुऱ्या जोडीने 2014 ते 2017 पर्यंत सनरायझर्स हैदराबादकडून एकत्र खेळले. या काळात, संघाने 2016 मध्ये आयपीएलचे विजेतेपदही पटकाले. धवन आणि वॉर्नर यांनी 50 डावांमध्ये एकत्र फलंदाजी केली आणि 48 च्या सरासरीने 2357 धावा केल्या.
विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसची जोडी आता तुटली आहे. द. आफ्रिकेचा खेळाडू फाफ डू प्लेसिस नवीन हंगामात दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला आहे. 2022 मध्ये, तो आरसीबीचा भाग झाला आणि विराटसोबत डावाची सुरुवात करायचा. या जोडीने 41 डावांमध्ये सुमारे 50 च्या सरासरीने 2032 धावा जोडल्या.
गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा ही जोडी टॉप-5 आहे. पण हे दोन्ही खेळाडू निवृत्त झाले आहेत. 2014 मध्ये, या जोडीमुळे केकेआरने आयपीएलचे विजेतेपद जिंकले. 2014 ते 2017 या कालावधीत गंभीर आणि उथप्पा यांनी 48 डावांमध्ये एकत्र बॅटिंग केली. या दरम्यान त्यांनी 40 च्या सरासरीने आणि 5 शतकी भागीदाऱ्या रचल्या. तर या जोडीने एकूण 1906 धावा जोडल्या.