

IPL 2026 Final Ticket: विराट कोहलीच्या आरसीबीने २०१६ मध्ये आयपीएल फायनल होस्ट केली होती. त्यावेळी त्यांचा सनराईजर्स हैदराबादने पराभव केला होता. आता आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ जवळ येत आहे. मात्र अजून फायनल कुठं होणार हे निश्चित झालेलं नाही. बीसीसीआय सचिव देवाजीत सिक्का यांनी नुकतेच आयपीएल प्ले ऑफचे शेड्युल जाहीर केले जाईल असं सांगितलं. मात्र बीसीसीआयसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
खूप दिवसांपासूनच बीसीसीआय कर्नाटक आणि पंजाबमध्ये आयपीएल २०२६ च्या प्ले ऑफचे सामने आयोजित करण्याचा विचार करत आहेत. तसेही प्रथेप्रमाणं बंगळुरू यंदाची आयपीएल फायनल होस्ट करण्याची शक्यता आहे. मात्र या शक्यतेला कर्नाटकातील आमदारांच्या एका मागणीमुळं सुरूंग लागण्याची शक्यता आहे.
एएनआयने बीसीसीआय सूत्रांच्या हलाव्याने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्यात आली आहे आणि जर हे प्रकरण मिटलं नाही तर आयपीएलचा अंतिम सामना दुसरीकडे हलवण्यात येईल.
सूत्रांनी एएनआयला सांगितलं की, 'आयपीएल २०२६ चे प्ले ऑफ आणि फायनलचे ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल. हे सामने पंजाब आणि कर्नाटकमध्ये विभागून दिले जातील. गतवर्षीचा विजेता हा आयपीएल फायनल होस्ट करतो. मात्र बंगळुरूमध्ये आमदार तिकीटावरून अडचण निर्माण करत आहेत. जर ही समस्या सुटली नाही तर बीसीसीआय फायनल दुसऱ्या शहरात हलवणार आहे.'
आयपीएलच्या परंपरेनुसार जो संघ गेल्यावेळी आयपीएल विजेता असतो त्याच्या होम ग्राऊंडवर आयपीएलची फायनल खेळवली जाते. त्यानुसार गतवर्षी आरसीबी विजेता झाली होती त्यामुळं यंदाची फायनल ही चिन्नास्वामी स्टेडियमवर होणे अपेक्षित आहे. मात्र राजकारण आणि ड्रामेबाजीमुळं चाहत्यांची नाहक फरफट होत आहे.
काँग्रेसचे आमदार विजयानंद कशप्पनवार यांनी जाहीररित्या जे निवडून आलेले आहेत त्यांना आयपीएलची काही तिकीटे कॉम्प्लिमेंटरी म्हणून देण्यात यावी अशी मागणी केली. त्यांनी आमदार हे व्हीआयपी आहेत त्यांना नेहमीच्या चाहत्यांप्रमाणे रांगेत उभे करू नये.
या विजयानंद यांच्या या मागणीला अनेक आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी एका आमदाराला किमान प्रत्येकी ५ तिकीटे आणि lounge areas चा अॅक्सेस देखील मिळावा असी मागणी केली आहे. यावरून कर्नाटक क्रिकेट असोसिएशन देखील टीकाकारांच्या रडारवर आली आहे. अनेक नेत्यांनी हे स्टेडियम हे सरकारी जमिनीवर आहे. यासाठी ते प्रत्येक महिन्याला फक्त १६०० रूपये भाडं देतात याकडे अनेकांनी लक्ष वेधले.
हे प्रकरण एवढं वाढलं की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना यात हस्तक्षेप करावा लागला. यानंतर प्रत्येक आमदार, खासदार आणि एमएलसीला चिन्नास्वामी स्टेडियमची प्रत्येकी तीन तिकीट कॉम्प्लिमेंटरी म्हणून देण्यावर तडजोड झाल्याचं जाहीर करण्यात आलं.
या आमदार तिकीटामुळं दुसऱ्याच एका वादाला तोंड फुटलं. चाहत्यांनी या मोफतच्या तिकीटावरून टीका करण्यास सुरूवात केली आहे. चाहत्यांना या आयपीएल सामन्यांची तिकीटे खूप महाग मिळतात अनेकवेळा तर त्यांना ती मिळवणे देखील खूप कठीण जाते अशा परिस्थितीत आमदारांनी मोफतची तिकीटे मागण्यावरून सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ सुरू झाला आहे. चाहत्यांनी व्हीआयपी कल्चरवर टीका केली आहे. अनेक आमदारांनी जनभावनेचा आदर करत तिकीट नाकारले देखील आहेत. या वादाला कंटाळून बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.