

IPL 2026 Auction:
इंडियन प्रीमीयर लीगच्या २०२६ च्या मिनी लिलावासाठी १००० पेक्षा जास्त खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यात भारताच्या अनेक ज्युनिअर खेळाडूंसोबतच काही मोठ्या नावांचा देखील समावेश आहे. यात मयांक अग्रवाल, केएस भरत, राहुल चहर, रवी बिश्नोई, आकाश दीप, दीपक हुड्डा, सर्फराज खान, शिवम मावी, व्यंकटेश अय्यर, चेतन साकरिया, नवदीप सैनी, पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी उमेश यादव आणि संदीप वॉरियर यासारख्या बड्या खेळाडूंची नावे आहेत. आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव हा अबूधाबी इथं १८ डिसेंबर रोजी होणार आहेत.
क्रिकबजच्या हाती आयपीएल रजिस्ट्रेशन लीस्ट लागली आहे. त्यात १३५५ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेच्या अनेक मोठ्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. जवळपास १३ एक्सेल पेजेस या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या नावांनी भरले आहेत.
कॅमरून ग्रीन, शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ ही काही मोठी ऑस्ट्रेलियन नावं यंदाच्या लिलावात दिसणार आहेत. त्यांना यंदाच्या हंगामात तरी एखादी फ्रेंचायजी खरेदी करेल अशी आशा आहे. जर जॉश इंग्लिस हा त्याच्या लग्नामुळं यंदाच्या हंगामासाठी उपलब्ध असणार आहे की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. मात्र त्यानं देखील लिलावासाठी नोंदणी केली आहे.
दुसरीकडं इंग्लंडकडून जेमी स्मिथ आणि जॉनी बेअरस्टो ही दोन मोठी नावं आहेत. न्यूझीलंडचा रचिन रविंद्र, श्रीलंकेचे वानिंदू हसरंगा आणि मथीशा पथिराना या हे खेळाडू देखील लिलावात दिसणार आहेत.
भारताचे फक्त दोनच खेळाडू असे आहेत ज्यांची लिलावातील बेस प्राईस ही २ कोटी रूपये इतकी असणार आहे. त्यात रवी बिश्नोई आणि व्यंकटेश अय्यर यांचा समावेशी आहे. व्यंकटेश अय्यरला केकेआरने मेगा लिलावात २० कोटी पेक्षा जास्त रक्कम देऊन खरेदी केलं होतं.
किमान २ कोटी बेस प्राईस असलेल्या खेळाडूंमध्ये ४३ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यात कॅमरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, जेमी स्मिथ, मुजीब-उर-रहमान, नवीन-उल-हक, सीन अॅवॉट, एगर, कपूर कोनोली, मॅकगर्क, इंग्लिस, मुस्तफिजूर रहमान, एटकिंसन, टॉम बॅटमन, टॉम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, डॅनियल लॉरेन्स, लिव्हिंगस्टोन, डॅरेल मिचेल, रचिन रविंद्र, मायकल ब्रेविस, जेराल्ड कोएट्जी, एन्गिडी, नोर्खिया, पथिराना, महेश तिक्षाणा, हसरंगा यासारख्या तगड्या नावांचा देखील समावेश आहे.
दुसरीकडं शाकीब अल हसनने देखील आपण आयपीएलसाठी उपलब्ध असल्याचं जाहीर केलं असून त्यानं आपली बेस प्राईस ही १ कोटी रूपये ठेवली आहे. शाय होप, अकील हुसेन आणि अल्झारी जोसेफ यांनी आपली बेस प्राईस ही दीड कोटी रूपये ठेवली आहे. एकूण १४ देशांच्या खेळाडूंनी आयपीएल लिलावात नोंदणी केली आहे.
जरी १३५५ खेळाडूंनी नोंदणी केली असली तरी ही लीस्ट शॉर्टलीस्ट होईल. त्यावेळी किती खेळाडू शिल्लक राहतील हे पहावे लागेल. खेळाडूंमध्ये आयपीएलची क्रेझ अजूनही टिकून आहे. २०२६ च्या मिनी लिलावासाठी १० संघांकडे २३७.५५ कोटी रूपयांची एकूण पर्स उपलब्ध आहे. १० संघांना मिळून एकूण ७७ स्लॉट भरायचे आहेत. यातील ३१ परदेशी खेळाडूंचे स्लॉट आहेत.