

IPL 2025 Six Venues Revised Schedule Final match date
नवी दिल्ली : भारत- पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेला आयपीएल 2025 चा हंगाम पुन्हा सुरू होणार आहे. केंद्र सरकार, सुरक्षा यंत्रणांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलांनी पाकिस्तानमध्ये घुसून 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. 8 मेरोजी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्या धर्मशाळा येथे सुरू असलेला सामनाही थांबवावा लागला होता. पाकिस्तानने ड्रोन हल्ला केल्याने पंजाब, राजस्थान, जम्मू- काश्मीर येथील पाकिस्तान सीमेलगतच्या भागात पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आले होते. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने तातडीने धर्मशाळा येथील सामना रद्द केला होता.
9 मे रोजी बीसीसीआयने परिस्थितीचा आढावा घेतला होता. सुरक्षा यंत्रणा आणि सरकारशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने एक आठवडासाठी आयपीएल स्थगित करत असल्याची घोषणा केली होती. अखेर 12 मे रोजी रात्री बीसीसीआयने आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून आयपीएलचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. 17 मेपासून आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे.
क्वालिफायर 1 – 29 मे
एलिमिनेटर – 30 मे
क्वालिफायर 2 – 1 जून
अंतिम सामना – 3 जून
सहा ठिकाणी हे सामने खेळवले जाणार आहेत. नेमक्या कोणत्या मैदानांवर हे सामने खेळवले जातील, याचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल, असे बीसीसीआयने माध्यमांना पाठवलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
22 मार्च ते आत्तापर्यंत काय घडले?
आयपीएल 2025 ची सुरूवात 22 मार्च रोजी झाली. 8 मेपर्यंत एकूण 58 सामने पार पडले आहेत. तर 16 सामने अजूनही बाकी आहेत. यापूर्वी 2021मध्ये कोव्हिड 19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान आयपीएल हंगामातील सामने अर्धवट थांबवण्यात आले होते. नंतर उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात यूएईत खेळवण्यात आले होते.