

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mayank Yadav : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. या संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतीतून बरा झाला आहे. तो लवकरच पुन्हा मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. एलएसजीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एका खास व्हिडिओद्वारे मयंकच्या पुनरागमनाची घोषणा केली.
मयंक यादव आतापर्यंत पाठीच्या आणि पायाच्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघ आणि आयपीएल 2025 मधून बाहेर होता. तो बेंगळुरूमधील एनसीएमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करत होता. मयंक मंगळवारी (15 एप्रिल) रात्री संघाच्या कॅम्पमध्ये दाखल झाला. तो 19 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये आयपीएलमध्ये मयंक यादवची कामगिरी उत्तम झाली होती. त्याने आपल्या वेगवान मा-याने सर्वांना प्रभावित केले होते.
2024च्या हंगामात मयंक यादवने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याने फेकलेल्या चेंडूचा वेग 156.7 किमी प्रतितास नोंदवला गेला. त्या हंगामातील चार सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या. 4 सामन्यांनंतर त्याला दुखापत झाली. त्यामुळे उर्वरित सामने तो खेळू शकला नाही.
आयपीएल 2024 मधील प्रभावी कामगिरीनंतर, मयंकला बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले. या मालिकेतील 3 सामन्यांमध्ये त्याने 4 विकेट्स घेतल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली. पण पाठीच्या दुखापतीमुळे तो पुन्हा क्रिकेटपासून दुरावला. त्यानंतर त्याला मैदानात कमबॅक करण्यास उशीर झाला आहे.
मात्र, यासाठी त्याला लखनौ संघाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असेल. लखनौने आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 3 गमावले आहेत. हा संघ सध्या पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. एलएसजीचे गोलंदाजी युनिट संघासाठी चिंतेचा विषय बनले आहे, परंतु मयंकच्या पुनरागमनंतर वेगवान आक्रमणाला धार येईल असा विश्वास, फ्रँचायझीने व्यक्त केला आहे.