

पुढारी ऑनलाईन डेस्क : युझवेंद्र चहलने गेल्या वर्षीच्या आयपीएल हंगामात 200 विकेट्सचा टप्पा गाठला. आयपीएल इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला. दुसरा कोणताही गोलंदाज अद्याप बळींचे द्विशतक पूर्ण करू शकलेला नाही. सक्रिय गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार दुस-या स्थानी आहे. त्याच्या नावावर 186 विकेट्स आहेत. चहल यंदाच्या हंगामात पंजाब किंग्ससाठी (PBKS) खेळत आहे. मेगा लिलावात प्रिती झिंटाच्या फ्रँचायझीने या लेग स्पिनरसाठी 18 कोटी रुपये मोजले आहेत. पण स्पर्धेतील पाच सामन्यांनंतर युझीच्या प्रभावीपणाबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
आयपीएलच्या 18 व्या हंगामात चहलला पाच डावांमध्ये केवळ दोन विकेट्स मिळाल्या आहेत. यादरम्यान त्याची इकॉनॉमी 11.13 आहे. तीन सामन्यांमध्ये तर त्याला चार षटकांचा स्पेल पूर्ण करण्याची संधी देखील मिळालेली नाही. 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून सातत्यपूर्ण विकेट घेणारा गोलंदाज म्हणून चहलची ओळख होती. त्याची एका हंगामातील इकॉनॉमी 9.41 (2024 हंगाम) पेक्षा कधीही जास्त नव्हती. पण यावर्षी त्याची इकॉनॉमी 11.13 पर्यंत पोहचली आहे. शनिवारी (दि. 12) सनरायझर्स हैदराबाद (SRH)च्या फलंदाजांनी चहलच्या चार षटकांत 56 धावा चोपल्या. यादरम्यान त्याला ट्रॅव्हिस हेडची एकच विकेट मिळाली.
एसआरएचच्या अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चहलवर सुरुवातीपासून हल्ला चढवला. यावेळी आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणा-या या फिरकीपटूची भांबेरी उडाली. कसेतरी एकदाचे षटक पूर्ण करण्याच्या इराद्याने त्याने चेंडू केवळ सोडले. चहलमध्ये पूर्वीसारखी विकेट टीपण्याची उर्मी दिसली नाही. तो फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्नच करत नव्हता. त्याने चेंडू वाईड टाकण्याचा आणि ‘सेफ गेम’ खेळण्याचा पवित्रा अवलंबला.
चहलने आतापर्यंतच्या सामन्यात 15 षटके टाकली आहेत. यादरम्यान त्याला काही सामन्यांमध्ये चार षटकांचा कोटा पूर्ण करण्याचीही संधी मिळालेली नाही. सध्याच्या हंगामातील त्याची सरासरी 11-12 धावांपेक्षा जास्त आहे. तो बचावात्मक खेळ करत आहे. त्याच्या चेहऱ्यावर दबाव स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्याकडे चेंडूला वळण देण्याची, गुगली टाकण्याची क्षमता राहिली आहे की नाही अशी शंका निर्माण होत आहे.
पंजाब किंग्सचा संघ गेल्या 17 वर्षापासून आयपीएलच्या विजेतेपदापासून वंचित राहिला आहे. यंदा तरी ट्रॉफी उंचावता यावी यासाठी फ्रँचायझीने यंदाच्या लिलावात मोठे खेळाडू विकत घेतले. यात त्यांनी चहलसाठी मोठी बोली लावली आणि त्याच्यासाठी 18 कोटी रुपये खर्च केले. चहल हा आयपीएल लिलावात खरेदी केलेला सर्वात महागडा फिरकीपटू ठरला.
पंजाबने 18व्या हंगातील पाच सामने खेळले असून त्यापैकी तीन जिंकले आहेत. या सर्व सामन्यांत चहला खेळण्याची संधी मिळाली आहे. प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून त्याला मैदानात उतरवले जाते. मात्र, आयपीएलच्या प्लेऑफची शर्यत तीव्र होत असताना चहलचा फॉर्म पंजाबचे विजेतेपदाचे स्वप्न धूळीस मिळवेल की काय अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पंजाबला चांगली कामगिरी करायची असेल चहलबद्दल ठोस निर्णय घ्यावा लागेल.