

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2025 : मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 18व्या हंगामात विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. गेल्या काही हंगामांमध्ये त्यांचे प्रदर्शन अपेक्षेप्रमाणे झाले नाही, पण यावेळी त्यांनी जोरदार कमबॅक करण्याचा निर्धार केला आहे. स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली होती. जेतेपदाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवण्यास संघ सज्ज झाला आहे.
मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. एमआय हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. मेगा ऑक्शनपूर्वी मुंबईने आपली कोअर टीम रिटेन केली. फ्रँचायझीने कर्णधार हार्दिक पंड्या व्यतिरिक्त माजी कर्णधार रोहित शर्मा, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव आणि प्रतिभावान तिलक वर्मा यांना संघात कायम ठेवले. या पाच खेळाडूंवर एकूण 75 कोटी रुपये खर्च केले गेले. हे खेळाडू संघाची सर्वात मोठी ताकद मानली जातात.
मुंबई इंडियन्सचा पूर्णवेळ कर्णधार हार्दिक पंड्या 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही. मागील हंगामातील अखेरच्या सामन्यात त्याच्यावर स्लो-ओव्हर रेटच्या कारणामुळे एक सामन्याची बंदी घालण्यात आली. ती बंदी आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यासाठी लागू असणार आहे. त्यामुळे पंड्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे पहिल्या काही सामन्यांत बाहेर राहू शकतो, परंतु हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात तो संघात पुनरागमन करेल अशी चर्चा आहे.
आयपीएलच्या सर्व संघांवर नजर टाकली तर सर्वात धोकादायक फलंदाजी क्रम मुंबई इंडियन्सचा मानला जाऊ शकतो. या संघात रायन रिकेल्टनसह विल जॅक्स आणि रोहित शर्मासारखे धोकादायक सलामीवीर आहेत. त्यानंतर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि नमर धीरसारखे पॉवर हिटर्स फलंदाज आहेत. हा फलंदाजीचा क्रम पाहून विरोधी संघाला घाम फुटू शकतो.
याशिवाय, संघाकडे धोकादायक गोलंदाजी मारा आहे, जे कोणत्याही फलंदाजीच्या आक्रमणाला उद्ध्वस्त करू शकतात. ट्रेंट बोल्टकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याच्यासाठी एमआयने 12.5 कोटी रुपये मोजले आहेत. याशिवाय, संघातील दीपक चहर, विल जॅक्स आणि अल्लाह गझनफर सारख्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील. याशिवाय, संघात भरपूर पर्याय आहेत, मग ते सलामीवीराच्या स्वरूपात असो किंवा वेगवान आक्रमणाच्या स्वरूपात असो.
गेल्या हंगामाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने आपला कर्णधार बदलला होता. रोहितच्या जागी पंड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले. अशा परिस्थितीत मुंबईचे चाहते खूप संतापले. पंड्याला मैदानावर चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. संघातही सुसंवाद नव्हता. संघ काही गटांमध्ये विभागलेला दिसला. मात्र यंदाच्या हंगामात यात सुधारणा होऊ शकते. पंड्याला चाहत्यांचा विश्वास परत मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे.
फ्रँचायझीने कोअर टीम कायम ठेवण्यासाठी 75 कोटी रुपये मोजले, ज्यामुळे 45 कोटींसह मेगा लिलावात उतरावे लागले. परिणामी कोणत्याही इतर मोठ्या खेळाडूची खरेदी करता आली नाही. संघाचे मुख्य खेळाडूंवर अवलंबित्व जास्त आहे. जर प्रमुख खेळाडू फॉर्ममध्ये नसतील किंवा दुखापतग्रस्त असतील तर त्याचा संघाच्या कामगिरीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. संघात अनेक वयस्कर खेळाडू देखील आहेत. संघात काही चांगले फलंदाज असले तरी, चांगला यष्टीरक्षक नाही. जर रायन रिकेलटनला यष्टीरक्षक म्हणून प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट केले गेले आणि तो चांगली कामगिरी करू शकला नाही तर हा परदेशी खेळाडू संघासाठी ओझे ठरेल.
गेल्या हंगामात मुंबईची कामगिरी फारशी खास नव्हती. 14 पैकी 4 सामने जिंकून हा संघ पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर राहिला. आयपीएलमध्ये स्पर्धा वाढली आहे. अशा परिस्थितीत पराभवाची भीती नेहमीच राहते. जसप्रीत बुमराहची दुखापत ही मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे. दुखापतीमुळे बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला नाही. अशा परिस्थितीत बुमराहची दुखापत नेहमीच संघासाठी धोका ठरते. संघात युवा खेळाडूंचा अभाव असून चांगला यष्टीरक्षक फलंदाजही नाही.
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, बेव्हॉन जेकब्स, रायन रिकेल्टन, रॉबिन मिंज, कृष्णन श्रीजित, नमन धीर, राज अंगद बावा, विघ्नेश पुथूर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, अर्जुन तेंडुलकर, अश्विनी कुमार, रीस टोप्ले, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, वेंकट सत्यनारायण राजू, मुजीब-उर-रहमान, कॉर्बिन बॉश.