IPL 2025: मुंबई इंडियन्सच्या विजयाची गाडी सुसाट; लखनौ सुपरजायंट्सवर 54 धावांनी मात
IPL 2025 MI vs LSG
मुंबई : आयपीएल 2025 स्पर्धेत सुरवातीला अडखळत सुरवात झालेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या विजयाची गाडी आता रूळावरून सुसाट धावू लागली आहे.
रविवारी 27 एप्रिल रोजी दुपारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने लखनौ सुपर जायंट्स संघाला 54 धावांनी हरवले.
मुंबईच्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना निर्धारीत 20 षटकांत लखनौचा संघ सर्वबाद 161 धावा करू शकला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सने पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
बुमराच्या 4 तर बोल्टच्या 3 विकेट
मुंबई इंडियन्सच्या 216 या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सला सलामीवर ऐडन मार्क्रमच्या विकेटच्या रूपात पहिला धक्का बसला. तो अवघ्या 9 धावांवर माघारी परतला.
पण दुसरा सलामीवीर मिचेल मार्श (34) आणि निकोलस पुरन (27) यांनी फटकेबाजी करत धावफलक हलता ठेवला.
कर्णधार रिषभ पंत अवघ्या 4 धावांवर तंबूत परतला. आयुष बदोनी याने 35 तर डेव्हिड मिलरने 24 धावा केल्या. त्यानंतरचे फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. अब्दुल समद (2), रवी बिष्णोई (13), आवेष खान (0), दिग्वेश राठी (1) हे क्रीजवर केवळ हजेरी लावून गेले.
मुंबईकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्टने 3 विकेट घेतल्या. विल जॅक्सने 2 तर कॉर्बिन बॉशने 1 विकेट घेतली. लखनाै संघाने सर्वबाद 161 धावा केल्या.
रिकलटन, सूर्यकुमार यादव यांची अर्धशतके
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 215 धावा केल्या. रोहित शर्मा अवघ्या 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर दुसरा सलामीवीर रायन रिकलटन याने 32 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 58 धावा फटकावल्या.
त्याला विल जॅक्सची 21 चेंडूत 29 धावांची साथ मिळाली. त्यानंतर सूर्यकुमार यादव याने अवघ्या 28 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या सहाय्याने 54 धावा फटकावल्या.
नमन धीर, बॉश यांची फटकेबाजी
त्यानंतर तिलक वर्मा (6), हार्दिक पंड्या (5) हे फारशी चमक दाखवू शकले नाहीत. अखेरच्या काही षटकांमध्ये नमन धीर (नाबाद 25 - चेंडू-11, चौकार-2, षटकार-2) आणि कॉर्बिन बॉश (20) यांच्या फटकेबाजीमुळे मुंबईला 200 चा टप्पा ओलांडता आला.
लखनौकडून मयांक यादव आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 2 तर प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

