

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या आधी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे मेगा लिलाव होणार आहे. यासाठी 574 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 366 भारतीय आणि 208 परदेशी खेळाडू आहेत. याशिवाय सहयोगी देशांच्या 3 खेळाडूंनाही या यादीत स्थान मिळाले आहे. 318 भारतीय अनकॅप्ड खेळाडू आणि 12 अनकॅप्ड परदेशी खेळाडूदेखील लिलावात भाग घेतील; परंतु या वर्षी मेगा लिलावात अवघ्या 13 वर्षांचा खेळाडू सहभागी झाला आहे. (Vaibhav Suryavanshi IPL 2025 Mega Auction)
वास्तविक, बिहारमधील समस्तीपूर येथील वैभव सूर्यवंशी हा लिलावात सर्वात तरुण खेळाडू आहे. वैभव सूर्यवंशी अवघ्या 13 वर्षांचा आहे. यापूर्वी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये आपली कामगिरी सिद्ध केली आहे. एवढेच नाही, तर वैभवने हेमंत ट्रॉफी, कूचबिहार ट्रॉफी आणि विनू मंकड ट्रॉफी खेळली आहे. त्याला भारतीय अंडर-19 संघातही स्थान मिळाले आहे. वैभव सूर्यवंशीची मूळ किंमत 30 लाख रुपये आहे.
वैभव सूर्यवंशी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळला आहे. या काळात त्याने 10 डावांत 10 च्या सरासरीने आणि 64 च्या जवळपास स्ट्राईक रेटने 100 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 41 धावा आहे. अलीकडेच भारतीय अंडर-19 संघाचा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध मोठा टप्पा गाठला होता. वैभवने 64 चेंडूंत 104 धावांची खेळी केली होती. या काळात त्याने 14 चौकार आणि 4 षटकार मारले.
आयपीएल 2025 साठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी खेळाडूंसाठी बोली लावली जाईल. यासाठी अंतिम खेळाडूंच्या यादीत एकूण 574 खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या मेगा लिलावात सर्वात वयस्कर खेळाडू इंग्लंडचा जेम्स अँडरसन असेल आणि सर्वात तरुण खेळाडू बिहारचा वैभव सूर्यवंशी असेल. लिलाव झालेल्या खेळाडूंच्या यादीत वैभव सूर्यवंशी याला 491 वा क्रमांक मिळाला आहे. अनकॅप्ड खेळाडू म्हणून वैभवचा समावेश करण्यात आला आहे.