

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही. ही स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) च्या सीईओंनी अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवण्यामागील कारण उघड केले असून व्यंकटेश अय्यरला या जबाबदारीपासून का दूर ठेवले याचाही खुलासा केला आहे.
मेगा लिलावापूर्वी गतविजेत्या केकेआरने त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यरला रिलीज केले होते. यानंतर संघ नवीन कर्णधाराच्या शोधात होता. 3 मार्च रोजी, फ्रँचायझीने अजिंक्य रहाणेला संघाचा कर्णधार आणि व्यंकटेश अय्यरला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले. हा निर्णय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक होता, सर्वजण अंदाज लावत होते की श्रेयसनंतर वेंकटेशला कर्णधार बनवले जाऊ शकते पण तसे झाले नाही.
केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी या संदर्भात मोकळेपणाने भाष्य केले. ते म्हणाले की, ‘आयपीएल ही एक अतिशय रोमांचक स्पर्धा आहे. आम्हाला व्यंकटेश अय्यरबद्दल खूप आदर आहे, पण त्याच वेळी एका तरुण खेळाडूसाठी कर्णधारपद खूप कठीण असते. आपण पुढे जात असताना, अनेक लोकांना यामध्ये आव्हानांना तोंड द्यावे लागते. यासाठी खूप स्थिरता, परिपक्वता आणि अनुभव आवश्यक आहे. यासाठी, अजिंक्य रहाणे आम्हाला सर्वोत्तम पर्याय वाटला.’
2021 मध्ये केकेआरमध्ये सामील झालेल्या वेंकटेशला गेल्या वर्षी म्हणजे 2024च्या लिलावापूर्वी संघाने रिलीज केले होते. पण आरसीबीसोबतच्या लिलावात झालेल्या कठीण संघर्षानंतर त्याला 23.75 कोटी रुपयांना परत विकत घेण्यात आले. या डावखुऱ्या फलंदाजाने 51 आयपीएल सामन्यांमध्ये 1,326 धावा केल्या आहेत. त्याने त्याचे सर्व आयपीएल सामने केकेआरकडून खेळले आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) मध्ये दोन वर्षे घालवल्यानंतर रहाणे केकेआरमध्ये परतत आहे. त्याने स्वतःला टी-20 खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे. रहाणेने 2022 च्या हंगामात केकेआरसाठी सात सामने खेळले आणि 133 धावा केल्या. मुंबईच्या या अनुभवी फलंदाजाला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचाही अनुभव आहे. रहाणेने 2018 आणि 2019 च्या हंगामात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले. रहाणे हा मुंबई रणजी संघाचा कर्णधार आहे आणि विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात तो भारतीय संघाचा नियमित उपकर्णधारही होता.
रहाणे यापूर्वी केकेआरकडून खेळला आहे. 2024 मध्ये फ्रँचायझीने त्याला मेगा लिलावात त्याच्या 1.5 कोटी रुपयांच्या बेस प्राईसला विकत घेतले. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने नुकत्याच संपलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये उपांत्य फेरी गाठली. केकेआर संघात कर्णधारपदासाठी फारसे पर्याय नाहीत. भारतीय खेळाडूंपैकी त्याला रहाणे, वेंकटेश आणि रिंकू सिंग यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार होती. या शर्यतीत रहाणेने बाजी मारली.