IPLमधील ‘हे’ विक्रम, जे मोडण्याची शक्यता कमीच; जाणून घ्या आकडेवारी

IPL 2025 Records : आयपीएलची सुरुवात 22 मार्च रोजी
IPL 2025 Records
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2025 Records : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)ची सुरुवात 22 मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) यांच्यातील सामन्याने होईल. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर रंगणार आहे. या प्रतिष्ठित टी-20 लीगमध्ये काही विक्रम पणाला लागतील. दरम्यान, लीगमधील अशा काही विक्रमांबद्दल जाणून घेऊया जे मोडणे खूप कठीण आहे.

सर्वाधिक सांघिक धावसंख्येचा विक्रम

आयपीएल 2024मध्ये आरसीबीविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना एसआरएचने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 287 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वोच्च सांघीक धावसंख्या ठरली. त्या सामन्यात एसआरएच सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 41 चेंडूत 102 धावा कुटल्या होत्या. या वादळी खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 षटकार ठोकले होते. एसआरएचने त्यांच्या मागील विक्रमात (2024 मध्ये एमआय विरुद्ध 3 बाद 277) सुधारणा केली होती.

सलग 15 हंगामात 300+ स्कोअर

आयपीएल 2024 मध्ये, कोहलीने 61.75 च्या सरासरीने आणि 154.70 च्या स्ट्राईक रेटने 741 धावा फटकावल्या. तो आता सलग 15 हंगामात 300 पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव खेळाडू आहे. 2010 पासून त्याच्या हंगामातील धावा अनुक्रमे 307, 557, 364, 634, 359, 505, 973, 308, 530, 464, 466, 405, 341, 629 आणि 741 अशा आहेत. तो 2025च्या हंगामातही हीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

तीन हॅट्रिक घेणारा मिश्रा एकमेव गोलंदाज

आयपीएलच्या इतिहासात 3 हॅट्रिक घेणारा अमित मिश्रा हा एकमेव गोलंदाज आहे. 2008 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या हंगामात त्याने डेक्कन चार्जर्सविरुद्ध (5/17) पहिली हॅटट्रिक घेतली. त्यानंतर त्याने 2011 मध्ये पंजाब किंग्ज (तेव्हाचे किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध त्याची दुसरी हॅटट्रिक घेतली. त्या सामन्यात त्याने 9 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. तर 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध (4/19) तिसरी हॅटट्रिक नोंदवली. त्याच्यानंतर युवराज सिंगचा क्रमांक लागतो. त्याच्या खात्यात 2 हॅट्रिक जमा आहेत.

एका हंगामात सर्वाधिक धावा

2016 च्या आयपीएलमध्ये विराट कोहलीने अविश्वसनीय कामगिरी केली आणि 973 धावा तडकावल्या. कोहलीने 16 सामन्यांमध्ये 81 च्या प्रभावी सरासरीने या धावांचा पाऊस पाडला. यादरम्यान त्याने 4 शतके आणि 7 अर्धशतके फटकावली. हा विक्रम मोडणे अत्यंत कठीण आहे. त्याच्याशिवाय, इतर कोणत्याही फलंदाजाने आयपीएलच्या एकाच हंगामात 900 धावांचा टप्पा ओलांडलेला नाही. शुभमन गिलने 2023च्या आयपीएलमध्ये 59.33 च्या सरासरीने 890 धावा केल्या होत्या.

एका सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा

आयपीएलमधील ख्रिस गेलची सर्वात मोठी शतकी खेळी कधीही विसरता येणार नाही. युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या धडाकेबाज फलंदाजाने 2013 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)कडून खेळताना पुणे वॉरियर्स विरुद्ध नाबाद 175 धावा कुटल्या होत्या. त्याने ही मोठी खेळी खेळण्यासाठी फक्त 66 चेंडू खेळले. त्यांने या खेळीत 13 चौकार आणि 17 षटकार ठोकले. आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ब्रेंडन मॅक्युलम (नाबाद 158)च्या नावावर आहे.

सर्वाधिक वेळा अंतिम सामने खेळण्याचा विक्रम

सीएसकेचा महेद्र सिंह धोनी पहिल्या हंगामापासून आयपीएलमध्ये खेळत आहे. या अनुभवी क्रिकेटपटूने 11 वेळा (2008, 2010, 2011, 2012, 2013, 2015, 2017, 2018, 2019, 2021आणि 2023) अंतिम सामने खेळले आहेत. यापैकी त्याने 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे.

सलग 10 हंगाम प्लेऑफ

CSK ने आयपीएलच्या सलग 10 हंगामात (2008 ते 2019) प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. कोणत्याही संघासाठी अशी सातत्यपूर्ण कामगिरी करणे कठीण असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news