

18 वर्षे... एक दीर्घ प्रतीक्षा, असंख्य अपेक्षा आणि लाखो चाहत्यांचा अटळ विश्वास. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)ने अखेर 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2025 ची ट्रॉफी उंचावली. पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात 00 धावांनी रोमांचक विजय मिळवून RCB ने 18 वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम दिला. हा विजय केवळ एक जेतेपद नाही, तर भावनांचा महासागर आहे, ज्याने प्रत्येक RCB चाहत्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणले.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम खेळताना 9 विकेट्सच्या मोबदल्यात 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, पंजाब किंग्ज्सचा संघ संपूर्ण षटके खेळूनही केवळ 7 बाद 184 धावा करू शकला. लीग इतिहासातील हे आरसीबीचे पहिले विजेतेपद आहे.
2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून RCB चा प्रवास सुरू झाला. विराट कोहली, राहुल द्रविड, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल यांसारख्या दिग्गजांनी या संघाला आपले रक्त-घाम दिले, पण ट्रॉफीने नेहमीच हुलकावणी दिली. 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरीत पोहोचूनही RCB ला पराभवाचा सामना करावा लागला. प्रत्येक हंगामात चाहत्यांनी जेतेपद जिंकू असा विश्वास व्यक्त केला, पण प्रत्येकवेळी निराशा पदरी पडली. तरीही, RCB च्या चाहत्यांचा विश्वास कधी डगमगला नाही. बेंगळुरुच्या रस्त्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत, #PlayBold हा नारा चाहत्यांच्या हृदयात कायम जिवंत राहिला.
RCB चा हा विजय केवळ एक जेतेपद नाही, तर एका नव्या युगाची सुरुवात आहे. यंदाच्या हंगामात RCB ने दाखवलेली आक्रमकता, संतुलन आणि आत्मविश्वास यामुळे हा संघ आगामी हंगामातही यशस्वी होऊ शकतो. चाहत्यांच्या विश्वासाला आणि खेळाडूंच्या मेहनतीला मिळालेली ही ट्रॉफी RCB च्या इतिहासातील सुवर्णपान आहे.
अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज संघ 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांच्या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्यांना पहिला धक्का प्रियांश आर्यच्या रूपात बसला तो 24 धावा काढून बाद झाला. त्याच वेळी, प्रभसिमरन सिंग आणि जोश इंग्लिश यांच्या जोडीने डावाची सूत्रे हाती घेतली आणि धावसंख्या 72 धावांवर नेली. कृणाल पंड्याने प्रभसिमरनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, ज्यामुळे आरसीबी संघाने सामन्यात पुनरागमन केले आणि येथून त्यांनी पंजाब किंग्जला कोणत्याही प्रकारे सामन्यात परतण्याची संधी दिली नाही. या सामन्यात मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा असलेल्या श्रेयस अय्यरला फक्त एक धाव करता आली.
कृणाल पंड्याने अंतिम सामन्यात 2 बळी घेतले तर त्याच्या 4 षटकांमध्ये फक्त 17 धावा दिल्या, ज्यामुळे या अंतिम सामन्यात सर्वात मोठा फरक पडला. कृणाल व्यतिरिक्त, भुवनेश्वर कुमारनेही आरसीबीसाठी 2 विकेट्स घेतल्या
RCB चे जेतेपद हे प्रत्येक चाहत्याला समर्पित आहे, ज्याने प्रत्येक हंगामात संघाला साथ दिली. प्रत्येक पराभवानंतरही हसत हसत ‘पुढच्या वेळी नक्की!’ म्हणत विश्वास कायम ठेवला. RCB ची ही स्वप्नपूर्ती म्हणजे क्रिकेटच्या या उत्सवाचा खरा जल्लोष आहे. ‘ई साला कप नमदू’ हे स्वप्न अखेर सत्यात उतरले!