

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ajinkya Rahane KKR Captain : आयपीएलचा थरार 2 मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा हा 18 वा हंगाम आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने सोमवारी (3 मार्च) त्यांच्या कर्णधाराचे नाव जाहीर केले. शाहरुख खानच्या टीमने या जबाबदारीसाठी अजिंक्य रहाणेची निवड केली. नवीन हंगामासाठी आतापर्यंत 9 संघांनी त्यांचे कर्णधार जाहीर केले आहेत. यासह रहाणे या हंगामातील सर्वात स्वस्त कर्णधार बनला आहे.
केकेआरचा 22 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सलामीचा सामना रंगणार आहे. दरम्या, या सलामीच्या लढतीपूर्वी केकेआरने त्यांचे कर्णधार आणि उपकर्णधार दोघांचीही घोषणा केली. या हंगामातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू व्यंकटेश अय्यर (23.75 कोटी) याला उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. तथापि, सर्वांना अपेक्षा होती की त्याला कर्णधार बनवले जाईल. पण शाहरुख खानच्या संघाने सर्वात स्वस्त खेळाडूंपैकी एक असलेल्या अजिंक्य रहाणेकडे संघाची कमान सोपवून सर्वांना आश्चर्यचकित केले.
आयपीएलच्या मेगा लिलावात केकेआरने रहाणेला त्याच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. रहाणेची मूळ क्ंमत केवळ 1.50 कोटी होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्या फेरीत कोणत्याही संघाने त्याच्यासाठी बोली लावली नव्हती. तो अनसोल्ड राहतो की काय असे वाटत असतानाच शेवटच्या क्षणी केकेआरने त्याला विकत घेतले.
केकेआरमध्ये रहाणेचा हा दुसरा कार्यकाळ आहे. 2022 च्या सुरुवातीला, तो केकेआरकडून खेळला होता तेव्हा त्याने सात सामन्यांमध्ये 103.90 च्या स्ट्राईक रेटने 133 धावा केल्या होत्या. यानंतर रहाणेचा चेन्नई सुपर किंग्जमध्ये समावेश करण्यात आला. 2023 च्या हंगामात त्याने सीएसकेसाठी 172.48 च्या स्ट्राईक-रेटने 326 धावा केल्या.
2024 चा आयपीएल हंगाम रहाणेसाठी चांगला ठरला नाही. त्याने गेल्या वर्षी 123.46 च्या स्ट्राईक रेटने 242 धावा काढल्या. मात्र त्याला सीएसकेने रिलीज केले. त्यानंतर निराश न होता रहाणेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्यात तो टॉपवर राहिला. त्याने 164.56 च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक 469 धावा फटकावल्या. रहाणेला आयपीएलमध्ये 25 सामन्यांचा कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याने 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि 2018-19 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी 24 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. 2019 च्या हंगामाच्या मध्यात त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.
आयपीएलच्या मेगा लिलावात ऋषभ पंतने बरीच प्रसिद्धी मिळवली. लखनौ सुपर जायंट्स संघाने त्याला 27 कोटी रुपयांना खरेदी करून खळबळ उडवून दिली. यासह, तो या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला. अलिकडेच संघाचे मालक संजीव गोयंका यांनी पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवत असल्याचे जाहीर केले होते. याचा अर्थ असा की पंत हा या हंगामातीलच नाही तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार आहे.