

स्मृती मानधनाने जागतिक क्रिकेटमधील एका विशेष क्लबमध्ये सामील झाली आहे. महिला क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणारी ती जगातील चौथी आणि भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे.
india women vs sri lanka women
तिरुवनंतपुरम: भारत आणि श्रीलंका महिला संघात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय सलामीवीर स्मृती मानधनाने आपल्या कारकिर्दीत एक मोठी कामगिरी केली आहे. यासह ती जागतिक क्रिकेटमधील एका विशेष क्लबमध्ये सामील झाली असून, अशी कामगिरी करणारी ती जगातील केवळ चौथी खेळाडू ठरली आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत स्मृतीला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती, मात्र चौथ्या सामन्यात तिने शानदार फलंदाजी करत हा ऐतिहासिक टप्पा गाठला.
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची गणना सर्वोत्तम सलामीवीरांमध्ये केली जाते. खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तिने आपली छाप पाडली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात २७ धावा पूर्ण करताच स्मृतीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील (कसोटी, वनडे आणि टी-२० मिळून) १०,००० धावा पूर्ण झाल्या.या यशासह स्मृती मानधना महिला क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणारी जगातील चौथी आणि भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे. स्मृतीपूर्वी हा पराक्रम मिताली राज, सुझी बेट्स आणि शार्लोट एडवर्ड्स यांनी केला आहे.
खेळाडूचे नाव देश एकूण धावा
मिताली राज भारत १०,८६८
सुझी बेट्स न्यूझीलंड १०,६५२
शार्लोट एडवर्ड्स इंग्लंड १०,२७३
स्मृती मानधना भारत १०,०३०
स्टेफनी टेलर वेस्ट इंडिज ९,३०१
स्मृती मानधनाच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास, तिने ११७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८.३८ च्या सरासरीने ५,३२२ धावा केल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५७ सामन्यांत २९.८७ च्या सरासरीने ४,०५० पेक्षा जास्त धावा तिच्या नावावर आहेत. याशिवाय ७ कसोटी सामन्यांमध्ये तिने ५७.१८ च्या सरासरीने ६२९ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्मृती सध्या दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.