

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (BCCI) एका वरिष्ठ व्यक्तीने माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली.
VVS Laxman pproached for the Test team's coaching position
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी २०२५ हे वर्ष विरोधाभासाचे ठरले. एकीकडे टीम इंडियाने आशिया चषक (टी-२०) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी (वनडे) जिंकून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. तर दुसरीकडे मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभव (व्हाईटवॉश) झाला. यामुळे आता गौतम गंभीर यांच्या कसोटी प्रशिक्षकपदाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 'पीटीआय'च्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (BCCI) एका वरिष्ठ व्यक्तीने माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली.
दक्षिण आफ्रिकेने तर भारताचा मायदेशात २-० असा 'क्लीन स्वीप' केला. २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या ३-० अशा पराभवानंतर या ताज्या पराभवांमुळे गंभीर यांच्या कसोटी प्रशिक्षकपदाबाबत चर्चा सुरू आहे. 'पीटीआय'च्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (BCCI) एका वरिष्ठ व्यक्तीने माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली. त्यांना कसोटी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास रस आहे का, अशी विचारणा केली होती. मात्र, लक्ष्मण सध्या बंगळुरू येथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चे प्रमुख म्हणून काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रस्तावावर अधिक चर्चा केलेली नाही. दरम्यान, २०२५–२७ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) चक्रातील उर्वरित नऊ कसोटी सामन्यांसाठी गंभीर यांच्याकडेच प्रशिक्षकपद राहणार की नाही, याबाबत बीसीसीआयने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. या मुद्द्यावर सध्या बोर्डाच्या अंतर्गत वर्तुळात गंभीर चर्चा सुरू आहे.
गौतम गंभीरचा सध्याचा करार २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत आहे. मात्र, अवघ्या पाच आठवड्यांवर येऊन ठेपलेला टी-२० विश्वचषक त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारतीय संघाने जेतेपद राखले किंवा किमान अंतिम फेरीपर्यंत मजल मारली, तर गंभीरचे स्थान भक्कम होऊ शकते. मात्र, या स्पर्धेतील खराब कामगिरी गंभीरसाठी अडचणीची ठरू शकते, असे मानले जात आहे.
टीम इंडियाच्या कसोटी प्रशिक्षकांसाठी सध्या पर्याय मर्यादित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण वरिष्ठ कसोटी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास उत्सुक नाहीत. ते बेंगळुरू येथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (CoE) मधील आपल्या 'हेड ऑफ क्रिकेट' या भूमिकेत समाधानी आहेत. त्यामुळे अद्याप तरी याबाबत कोणतेही औपचारिक विधान बीसीसीआयने केलेले नाही.