लंडन : वृत्तसंस्था : लीडस्मधील पराभवाच्या कटू आठवणी विसरून भारतीय संघ उद्या पासून (गुरुवार) सुरू होणार्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी (INDvsENG 4st test) सामन्यात चांगली कामगिरी करीत मालिकेत आघाडी घेण्याच्या निर्धाराने ओव्हल मैदानात उतरेल. खराब फॉर्मचा सामना करीत असलेला अजिंक्य रहाणे आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्याबाबत संघ व्यवस्थापन काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे असेल.
लॉर्डस्वरील विजयानंतर भारतीय फलंदाजांनी हेडिंग्ले येथे झालेल्या तिसर्या कसोटीतील दोन्ही डावांत निराशा केली. तर, ओव्हल येथे होणारा सामना हा महत्त्वाचा असणार आहे. कारण, दोन्हीही संघ चौथ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. सध्या पाच सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. भारतीय कर्णधाराला आपल्या फलंदाजी फळीबाबत कल्पना आहे. संघाला सर्वाधिक चिंता आपल्या मध्यक्रमाची आहे. ज्यामध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे सारखे फलंदाज आहेत. (INDvsENG 4st test)
पुजाराने लीडस् येथील कसोटीच्या दुसर्या डावात 91 धावांची खेळी करीत फॉर्ममध्ये येण्याचे संकेत दिले; पण लॉर्डस्च्या दुसर्या डावात 61 धावांची खेळी करणार्या रहाणेला फारशी चमक दाखवता आलेली नाही. रहाणेला आणखी एक संधी मिळू शकते; पण त्याच्या कामगिरीत सातत्यपणा दिसत नाही. त्याचा फटका संघाला बसताना दिसत आहे. पाच डावांत 19 च्या सरासरीने रहाणेने 95 धावा केल्या आहेत.
संघाकडे सूर्यकुमार यादव सारखा आक्रमक आणि हनुमा विहारी सारखा पारंपरिक फलंदाजदेखील आहे. रहाणेला बाहेर करण्याची वेळ आली तर विहारीला संघात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. कारण, तो फिरकी गोलंदाजीदेखील करू शकतो. दरम्यान, संघासोबत राखीव खेळाडू म्हणून असलेल्या प्रसिद्ध कृष्णाला संघात सहभागी करवून घेण्यात आले आहे. मात्र, त्याला अंतिम अकरात स्थान मिळते का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि लोकेश राहुल शिवाय अन्य फलंदाजांच्या अपयशानंतर देखील कोहली पाच गोलंदाजांसह सामन्यात उतरण्याच्या आपल्या निर्णयाला कायम ठेवले.
रवींद्र जडेजा मालिकेत सातव्या क्रमांकावर फलंदाज म्हणूनच खेळला आहे. तर अश्विन हा जगातील सर्वोत्तम फिरकीपटू आहे. मात्र, जडेजानेदेखील तीन सामन्यांत दोन विकेटस् मिळवल्या आहेत. ओव्हलच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे संघात अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच इशांत शर्माऐवजी अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरलाही या सामन्यात संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी या मालिकेत आतापर्यंत 100 हून अधिक षटके टाकली आहेत.
इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटचा फॉर्मदेखील भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. रूटने तीन शतकांसह मालिकेत 500 हून अधिक धावा केल्या आहेत. तिसर्या कसोटी सामन्यात पुनरागमन करणारा डेव्हिड मलानदेखील चांगल्या फॉर्मात दिसला. मार्क वूड आणि ख्रिस वोक्स संघासोबत असल्याने जेम्स अँडरसनवरील दबाव थोडा कमी होईल. जॉनी बेअरस्टो या लढतीत यष्टिरक्षणाची जबाबदारी पार पाडेल. बटलर उपलब्ध नसल्याने मोईन अली उपकर्णधारपद सांभाळेल.
ओव्हलवर भारत आणि इंग्लंड यांच्यातल पहिला कसोटी सामना ऑगस्ट 1936 मध्ये खेळविण्यात आला होता. हा सामना इंग्लंडने जिंकला होता. तर, भारताने ओव्हलवर आपला पहिला विजय हा ऑगस्ट 1971 मध्ये मिळविला होता. या विजयास सुमारे 50 वर्षे झाली. त्यानंतर मात्र भारताला विजयासाठी केवळ प्रतीक्षाच करावी लागली. या मैदानावर दोन्ही देशादरम्यानची शेवटची कसोटी सप्टेंबर 2018 मध्ये झाली. यामध्ये इंग्लंडने 118 धावांनी विजय मिळविला होता.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, लोकेश राहुल, वृद्धिमान सहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर.
इंग्लंड : ज्यो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, रोरी बर्न्स, सॅम कुरेन, हसीब हमीद, डॅन लॉरेंस, डेव्हिड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स, मार्क वूड.