

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर पहिल्याच सामन्यात भारताला झिम्बाब्वेकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2024 मध्ये टी-20 सामन्यात भारताचा हा पहिला पराभव आहे. हरारे सुरु झालेल्या 5 टी-20 मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वेने 13 धावांनी जिंकला आहे. यामध्ये झिम्बाब्वे संघाचाचा कर्णधार सिकंदर रझा आणि तेंडाई चताराने प्रत्येकी 3 बळी घेतले. हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर 116 धावांचा पाठलाग भारतीय संघाला करता आला नाही.
भारताकडून कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिली फलंदाजी करत झिम्बाब्वेने 20 षटकामध्ये 9 गडी गमावून 115 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून यष्टिरक्षक क्लाइव्ह मदंडेने नाबाद 29 धावा केल्या, 10व्या विकेटसाठी त्याने तेंडाई चतारासोबत 25 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ही 25 धावांची भागीदारी भारताच्या विजयाचे अंतर ठरली आहे.
भारतीय संघ 116 धावांचा पाठलाग करत 19.5 षटकात 102 धावा करत ऑलआऊट झाला. कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक 31 धावा केल्या. तसेच शेवटच्या चेंडूपर्यंत वॉशिंग्टन सुंदर दिलेली झुंज अपयशी ठरली आहे. शेवटच्या चेंडूवर तो सुद्धा 27 धावा करून बाद झाला. भारताकडून आवेश खानने 16 धावांचे योगदान दिले. उर्वरित 8 फलंदाजांपैकी एकाही फलंदाजाला दुहेरी धावा संख्या गाठता आली नाही.