

पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni CSK : इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळला जाईल. दरम्यान, चाहते चेन्नई सुपर किंग्जच्या पहिल्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यामध्ये सीएसके संघ 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला सामना खेळेल. एमए चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे.
या सामन्यात सर्वांच्या नजरा सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनीवर आहेत. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी आपल्या खेळाने सर्वांचे मनोरंजन करत आला आहे. काही संघांविरुद्ध त्याची बॅट तळपते. त्यापैकी प्रमुख संघ म्हणजे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू.
धोनीने आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. आरसीबीविरुद्ध त्याने आतापर्यंत 36 सामने खेळले असून 39.27च्या सरासरीने आणि 141.87च्या स्ट्राइक रेटने 864 धावा केल्या आहेत. यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 84 आहे. यानंतर, धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. एमआयविरुद्ध 36 सामने खेळताना धोनीने 36.57 च्या सरासरीने 768 धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी अव्वल स्थानावर आहे. त्याने एकूण 264 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 39.12 च्या सरासरीने आणि 137.54च्या स्ट्राइक रेटने 5243 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या बॅटमधून 363 चौकार आणि 252 षटकारांची आतषबाजी झाली आहे.