

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे भालाफेकपटू आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेते डीपी मनू याला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) मोठा झटका दिला आहे. डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. मनूच्या सॅम्पलमध्ये मिथाइलटेस्टोस्टेरोन हे प्रतिबंधित पदार्थ आढळून आले, ज्यामुळे ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Indian Javelin thrower DP Manu ban by NADA)
25 वर्षीय मनूने 2023 मधील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तसेच बुडापेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहावे स्थान मिळवले होते. तर एप्रिल 2024 मध्ये बेंगळुरू येथे आयोजित इंडियन ग्रां प्री-1 मध्ये त्याने 81.91 मीटर भालाफेक करत स्पर्धा जिंकली होती. याच स्पर्धेदरम्यान घेतलेल्या नमुन्यांमध्ये डोपिंगची पुष्टी झाली.
डोप टेस्ट झाल्यानंतरही मनूने आणखी दोन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, तो पॅरिस ऑलिंपिक 2024 साठी निर्धारित असलेल्या 85.50 मीटर क्वालिफायिंग मार्कपर्यंत पोहोचू शकला नाही. तरीही, त्याला वर्ल्ड रँकिंगच्या आधारावर त्यांना ऑलिंपिकमध्ये स्थान मिळण्याची शक्यता होती. पण पंचकुला येथील राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपपूर्वी नाडाने त्याचे तात्पुरते निलंबित केले होते. नाडाच्या अँटी डोपिंग डिसिप्लिनरी पॅनेलने जारी केलेल्या ताज्या यादीनुसार, डीपी मनूच्या प्रकरणात अंतिम निर्णय 3 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. त्याच्या चार वर्षांच्या निलंबनाचा कालावधी 24 जून 2024 पासून लागू असेल.
डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्यामुळे 25 वर्षीय भालाफेकपटू मनूचे ऑलिंपिकमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले आहे. मनूची वैयक्तिक सर्वोत्तम फेक 84.35 मीटर आहे, जी त्याने जून 2022 मध्ये चेन्नई येथे गाठली होती. हे अंतर ऑलिंपिकसाठी पात्रता निकषापेक्षा थोडे कमी आहे.
अॅथलेटिक्स ड्रग डोपिंग पॅनेल (ADDP) ने विविध खेळांमधील खेळाडूंवर बंदी घातली आहे, ज्यामध्ये दोन ते सहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेचा समावेश आहे.
महिला रिले स्पर्धेतील धावपटू सिमरजीत कौर हिला एनाबॉलिक स्टेरॉइड्सच्या वापरामुळे चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 29 एप्रिल 2024 पासून लागू आहे. सिमरजीतने 400 मीटर, 4×400 मीटर आणि 4×400 मीटर मिश्रित रिले स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. 400 मीटर शर्यतीत तिची हंगामातील सर्वोत्तम वेळ 56.83 सेकंद आहे.
माजी ज्युनियर राष्ट्रीय हातोडा फेक चॅम्पियन नितीश पूनिया याच्या नमुन्यात प्रतिबंधित पदार्थाचे अंश सापडल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
ग्रीको-रोमन कुस्तीपटू नरिंदर चीमा यांच्यावरही नाडाने बंदी घातली आहे. चीमाने 2023 मध्ये हाँगझोव आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तो या स्पर्धेत नवव्या स्थानावर राहिले होता. त्याच्या नमुन्यातही एनाबॉलिक स्टेरॉइड्स आढळून आले होते. चीमा 97 किलो वजन गटात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कुस्ती संघाचा नियमित सदस्य राहिला आहे. त्याच्यावर 22 मे 2024 पासून बंदी लागू करण्यात आली आहे.
किक बॉक्सर रविंदर सिंग याच्यावर 3 एप्रिल 2024 रोजी बंदी घालण्यात आली होती. महिला बॉक्सर रेखा हिचेही एनाबॉलिक स्टेरॉइड्सच्या वापरामुळे 13 मार्च 2025 पासून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.