पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉकी इंडियाने बुधवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. 8 ते 17 सप्टेंबर या कालावधीत चीनमधील हुलून बुईर येथे खेळवल्या जाणा-या या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग करणार आहे. तर मिडफिल्डर विवेक सागर प्रसादकडे उपकर्णधार पद स्प्वण्यात आले आहे. अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला नवा गोलरक्षक मिळाला आहे. कृष्ण बहादूर पाठक आणि सूरज करकेरा यांच्यावर भारतीय गोल रक्षणाची जबाबदारी असणार आहे. (Indian Hockey Team Asian Champions Trophy)
जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय आणि सुमित हे बचावफळीत भक्कम करतील. तर राज कुमार पाल, नीलकंठ शर्मा, मनप्रीत सिंग आणि मोहम्मद राहिल हे मिडफिल्डमध्ये ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. युवा फॉरवर्ड लाइन आक्रमणाचे नेतृत्व करेल, ज्यात अभिषेक, सुखजित सिंग, अरयजित सिंग हुंडल, उत्तम सिंग आणि नवोदित गुरजोत सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ 8 सप्टेंबरला चीनविरुद्धच्या सामन्याने मोहिमेला सुरुवात करेल. दुसऱ्या दिवशी 9 सप्टेंबर जपान विरुद्ध तर 11 सप्टेंबरला मलेशिया आणि 12 सप्टेंबरला दक्षिण कोरियाशी लढत होईल. यानंतर 14 सप्टेंबरला पाकिस्तानशी सामना रंगणार आहे. स्पर्धेतील उपांत्य फेरी आणि अंतिम सामने अनुक्रमे 16 आणि 17 सप्टेंबर रोजी खेळवले जातील. गेल्या वर्षी झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. नुकतेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली कांस्यपदक पटकावले आहे. भारतीय कर्णधार हा त्या स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्यात अव्वल स्थाने राहिला. त्याने एकूण स्पर्धेत 10 गोल नोंदवले.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गतविजेत्या भारतीय संघासह, कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, जपान आणि यजमान चीन विजेतेपदासाठी स्पर्धा करतील.
निवड समितीने संघात बदल केला आहे. समितीने युवा खेळाडूंना संधी देत ताज्या दमाचा संघ तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचली आहेत. अशातच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारे दहा खेळाडू आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमधून संघाचा भाग आहेत. पण हार्दिक सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, समशेर सिंग आणि गुरजंत सिंग या पाच खेळाडूंना स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले, ‘आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची मोहिम आमच्यासाठी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. संघाच्या क्रमवारीतील गुण सुधारण्यासाठीची ही एक मोठी संधी आहे.’