

पुढारी ऑनलाईन डेस्क : Dodda Ganesh Kenya Team Head Coach : टी-20 विश्वचषक 2026 च्या पात्रता फेरीपूर्वी केनिया क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी टीम इंडियाचे माजी मध्यमगती गोलंदाज डोडा गणेश यांची केनिया पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. 51 वर्षीय डोडा गणेश यांनी भारतासाठी 4 कसोटी आणि 1 वनडे सामना खेळला आहे.
1996 ते 2011 या कालावधीत केनिया संघाने 5 वेळा विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला. भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या प्रशिक्षणाखाली या संघाने तर 2003 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाची उपांत्य फेरी खेळली होती. मात्र, त्यानंतर संघाच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत आहे. सध्या हा संघ आंतरराष्ट्रीय स्तरावरून जवळपास गायब झाला आहे. वनडे किंवा टी-20 मधील जगातील टॉप 20 संघांमध्ये देखील सध्या केनियाचा समावेश नाही. अशातच केनिया क्रिकेट बोर्डाशी अवघ्या वर्षभराचा करार झालेल्या डोडा गणेश यांना आफ्रिकन संघाची कामगिरी सुधारण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे.
51 वर्षीय डोडा गणेश यांनी 1997 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. ते उजव्या हाताने वेगवान गोलंदाजीसह खालच्या फळीत फलंदाजी करायचे. त्यांनी भारतासाठी 4 कसोटी आणि एक वनडे सामना खेळला. कसोटीच्या 7 डावांमध्ये त्यांनी एकूण 25 धावा केल्या. तर झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव एकदिवसीय सामन्यात त्यांच्या बॅटमधून 4 धावा निघाल्या. गोलंदाजीत त्यांनी कसोटीमध्ये 5 तर एकदिवसीयमध्ये 1 विकेट घेतली.
गणेश यांची देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारी लक्ष्यवेधी राहिली आहे. त्यांनी कर्नाटककडून 104 प्रथम श्रेणी सामने खेळताना 2,023 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 7 अर्धशतके झळकली. गोलंदाजीत त्यांच्या नावावर 365 विकेट आहेत. त्यांनी 89 लिस्ट ए सामने खेळले. यामध्ये त्यांच्या बॅटमधून 525 धावा निघाल्या. याशिवाय त्यांनी 128 बळीही घेतले.
दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू डोडा गणेश यांनी 2012-2013 मध्ये गोवा क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. निवृत्तीनंतर गणेश राजकारणाबरोबरच मनोरंजन क्षेत्रातही सक्रिय राहिले. ते माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जनता दल एसचे सदस्य होते. तर 2016 मध्ये बिग बॉस कन्नडमध्ये ते स्पर्धक होते.