

FIDE Womens Chess World Cup 2025
युवा ग्रँडमास्टर नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात इतिहास रचला आहे. सोमवारी (दि. २८ जुलै) झालेल्या टाय-ब्रेक सामन्यात दिव्याने आपल्याच देशाच्या कोनेरू हम्पी (Koneru Humpy) हिला हरवून महिला विश्वचषक २०२५ वर नाव कोरले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. सुरुवातीपासूनच सामना बरोबरीत सुटल्याने रविवारी तो क्लासिकल फेरीत अनिर्णीतपणे राहिला. तर अंतिम सामना टाय-ब्रेकमध्ये संपला.
टाय-ब्रेकचा पहिला रॅपिड डाव बरोबरीत सुटला. दरम्यान, दुसऱ्या डावात हम्पीनं काही चुका केल्या. ज्याचा दिव्याला फायदा झाला. या संधीचा फायदा घेत तिने विजय मिळवला. यामुळे ती भारताची ८८ वी ग्रँडमास्टर बनली. दिव्याने टाय-ब्रेकमध्ये १.५-०.५ असा विजय मिळवला.
हम्पी, आर. वैशाली आणि हरिका द्रोणावल्ली यांच्या पावलावर पाऊल ठेवून दिव्या देशमुख चौथी महिला भारतीय ग्रँडमास्टर बनली आहे.
या स्पर्धेत पहिल्यांदाच भारताच्या चार महिला खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. यात दिव्या देशमुख हिच्यासह कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली, आर. वैशाली यांचा समावेश होता.
गेल्या वर्षीच्या अखेरीस सिंगापूरमध्ये झालेली FIDE वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा डी. गुकेश याने जिंकली होती. त्यानंतर आता दिव्या देशमुखने FIDE महिला चॅम्पियनशीपचा किताब जिंकला आहे. २०२३ मध्ये, तिने आशियाई स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. २०२४ मध्ये, तिने जागतिक २० वर्षाखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत अपराजित राहून १०/११ गुणांसह पहिले स्थान पटकावले होते.