

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय सलामीवीर शुभमन गिलने (shubman gill) आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार (won icc mens player of the month) जिंकला आहे. बुधवारी याची घोषणा करण्यात आली. गिलने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स यांना मागे टाकत या पुरस्कारावर तिस-यांदा नाव कोरले. तो यापूर्वी वर्ष 2023 च्या जानेवारी आणि सप्टेंबरमध्ये प्लेअर ऑफ द मंथ ठरला होता.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शुभमन गिलच्या नावाचा समावेश राहिला. दरम्यान, अंतिम सामन्यानंतर गिलला आयसीसीने त्याला फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला आहे.
फेब्रुवारी महिन्यात शुभमन गिलची कामगिरी उत्कृष्ट राहिली. त्याने 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 101.50 च्या प्रभावी सरासरीने 406 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 94.19 होता. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा 3-0 असा दारुण पराभव केला. तिन्ही सामन्यात त्याने 50+ धावा फटकावल्या.
इंग्लंड विरुद्ध नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गिलने 87 धावांची शानदार खेळी केली. यानंतर, त्याने कटकच्या सामन्यात 60 धावा केल्या. तर अहमदाबाद येथील शेवटच्या लढतीत त्याने 102 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांसह 112 धावा कुटल्या.
गिलने आपली लय चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या आणि दुस-या सामन्यात कायम ठेवली. सुरुवातीला बांगला देशविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. तो 101 धावा करून नाबाद राहिला. या डावात त्याने 9 चौकार आणि 2 षटकारही मारले. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात गिलने 7 चौकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. गिल हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरला. त्याच्या खात्यात 5 सामन्यातून 188 धावा जमा झाल्या.
आतापर्यंत गिलने भारतासाठी 32 कसोटी सामन्यांमध्ये 35.05 च्या सरासरीने 1893 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने 55 एकदिवसीय सामन्यांमध्ये 59.04 च्या सरासरीने 2775 धावा आणि 21 टी-20 सामन्यांमध्ये 30.42 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 14 शतके फटकावली आहेत. यात टी-20 मशील 1, कसोटीतील 5 आणि वनडेतील 8 शतकांचा समावेश आहे.