

निमिष पाटगावकर
विश्वचषक 2022 अॅडलेड, विश्वचषक 2024 गयाना आणि विश्वचषक 2026 मुंबई तीन लागोपाठचे विश्वचषक आणि तिघांत साम्य एकच भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना. आता मुंबईला आज पुन्हा हेच दोन संघ अंतिम सामन्यावर हक्क सांगायला एकमेकांसमोर वानखेडेला समोर येत आहेत. हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. कारण, टी-20 चे संघ दोन वर्षांत बदलत असतात.
इंग्लंडची उपांत्य फेरी गाठायची कामगिरी बघितली, तर साखळी स्पर्धेत एक इटली सोडले, तर त्यांना नेपाळने दमवले, वेस्ट इंडिजने हरवले तर स्कॉटलंडने झुंजवले. याच इंग्लंड संघाने सुपर 8 मध्ये कात टाकून मात्र आपली कामगिरी उंचावर नेली. विशेषतः, श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा विजय त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा होता. बेथेल, बँटन आणि हॅरी ब्रूक ही इंग्लंडची या विश्वचषकातील खरी फलंदाजी आहे. त्यांना विजयी टेकू दिला आहे, तो अष्टपैलू सॅम कुरेन आणि विल जॅक्सने. एक वर्षापूर्वी इंग्लंडच्या भारत दौर्यात वरुण चक्रवर्तीने इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवले होते. इंग्लंडला आज रोखायला बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल ही आपली प्रमुख अस्त्रे असतील. विल जॅक्ससारखा अष्टपैलू पंधरा-वीस चेंडू खेळूनही धावसंख्या फुगवू शकतो. वानखेडेसारख्या लहान सीमारेषा असलेल्या मैदानावर ब्रूक आणि जॅक्स यांची फटकेबाजी आपण रोखली, तर अर्धी लढाई जिंकल्यासारखी होईल.
भारताच्या संघात काही बदल संभवत नाही. अभिषेक शर्माने याच मैदानात याच प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध केलेले आपल्या 2025 चे झंझावाती शतकाचे व्हिडीओ बघावेत. त्या सामन्यात वानखेडेवर 13 षटकार मारत त्याने आर्चर, वूड, ओव्हरटन आणि राशीदची धुलाई केली होती. त्यातले वूड सोडले, तर बाकीचे तिघे आजही संघात आहेत. संजू सॅमसनच्या समावेशामुळे आपल्या फलंदाजीला मजबूतपणा आलाच आहे; पण एक उत्तम बॅलन्स साधला आहे. होळी झाल्यापासून मुंबईतील उकाडा प्रचंड वाढला आहे. बुधवारी तापमान 36 डिग्री होते आणि आजही दुपारी तसेच असेल. संध्याकाळी सामना सुरू होईपर्यंत ते पाच-सहा डिग्रीने कमी होईल.
या अचानक वाढलेल्या तापमानाने खेळपट्टीला तडे न जाऊ देण्यासाठी बुधवारी पाणी मारले होते. आजच्या उन्हात तो ओलावा निघून जाईल आणि लाल मातीच्या या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर चांगला येईल. सुरुवातीची काही षटके जलदगती गोलंदाजांना मदत मिळेल; पण एकूण हा सामना म्हणजे फलंदाजांची आतषबाजी असेल. सूर्यास्तानंतर समुद्रावरून येणार्या वार्याच्या झुळुकीने हवा थोडी थंड होऊन मैदानावर दव असेल. दव असल्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेणे तत्त्वतः उचित वाटत असले, तरी या विश्वचषकातल्या चार सामन्यांत तीन सामने पहिली फलंदाजी करणार्या संघाने जिंकले आहेत.
मुंबईनगरी कष्ट करणार्या कुणालाही नाराज करत नाही आणि त्याचा मोबदला मिळतोच. तशीच मुंबईची खेळपट्टीही फलदांजी आणि गोलंदाजी दोघांनाही कष्ट केले, तर नाराज न करणारी आहे, हे आकडेवारी सांगते. ब्रूक, बेथेल, बँटन, कुरेन आणि जॅक्स विरुद्ध सॅमसन, किशन, सूर्या, बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या दोन्ही संघांतील पाच प्रमुख खेळाडूंची तुलना केली, तर भारताचे पारडे नक्कीच जड आहे. होळीच्या गुलालाची उधळण झाल्यावर आज तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींना भारताच्या विजयाच्या गुलालाची अपेक्षा असेल.