IND vs ZIM : धोनीच्या ‘या’ लाजिरवाण्या क्लबमध्ये शुभमनची एन्ट्री, जाणून घ्या रेकॉर्ड

शुबमन गिलने केली एमएस धोनीची बरोबरी
shubman gill ms dhoni
झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला टी-20 सामना गमावल्यानंतर भारतीय कर्णधार गिलच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shubman Gill MS Dhoni : झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला टी-20 सामना अवघ्या 13 धावांनी गमावल्यानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. या पराभवासह तो एमएस धोनीच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. वास्तविक, झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा टी-20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड खूपच उत्कृष्ट आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत 9 सामने खेळले गेले असून त्यापैकी 6 सामने भारताने जिंकले आहेत. तर 3 सामने गमावले आहेत. भारताने गमावलेल्या सामन्यांवेळी वेगवेगळे कर्णधार राहिले. ज्यात शुभमन गिलचा तिसरा कर्णधार म्हणून समावेश झाला आहे.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताला 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी-20I क्रिकेटमध्ये पहिला पराभव स्वीकारावा लागला. संघाने तो सामना 10 धावांच्या फरकाने गमावला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 145 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताला निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 135 धावा करता आल्या.

यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये संघाला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारताने तो सामना अवघ्या 2 धावांनी गमावला होता. त्या सामन्यातही झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत 170 धावा फलकावर लावल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मनीष पांडेच्या 48 धावांच्या खेळीनंतरही भारताला 20 षटकात 6 गडी गमावून 168 धावाच करता आल्या होत्या.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताला आता झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या सामन्यातही टीम इंडिया लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरली. झिम्बाब्वेच्या 115 धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातले. गिलच्या संघाला सर्वबाद 102 धावांपर्यंतच मजल मारता आली. धावांच्या बाबतीत टीम इंडियाचा या फॉरमॅटमध्ये झिम्बाब्वेविरुद्धचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news