
वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर संपुष्टात आला. यापूर्वी, भारताने आपला पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला होता. त्यामुळे भारताला २७० धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. वेस्ट इंडिजचा संघ फॉलोऑन वाचवू शकला नाही. फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना ३१९ धावांची गरज होती, परंतु संघ त्यापूर्वीच ऑल आऊट झाला. परिणामी, भारताने वेस्ट इंडिजला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजचा संघ पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला असून.
वेस्ट इंडिजच्या संघाने आज सामन्याच्या तिस-या दिवशी ४ बाद १४० धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली, मात्र उर्वरित सहा फलंदाज केवळ १०८ धावांत तंबूत परतले. भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने भेदक गोलंदाजी केली. त्याने पाच बळी घेतले. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील पाचवी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.
आजच्या खेळातील सुरुवातीचे तीन धक्के कुलदीपनेच दिले. त्याने शाय होप (३६), तेविन इमलाक (२१) आणि जस्टिन ग्रीव्हज (१७) यांना माघारी पाठवले. त्यानंतर, मोहम्मद सिराजने जोमेल वॉरिकनला (१) त्रिफळाचीत केले. जसप्रीत बुमराहने खेरी पिएर (२३) चा बळी घेतला. अखेरीस, कुलदीपने जेडन सील्सला (१३) पायचीत करत ८१.५ षटकांत वेस्ट इंडिजचा डाव २४८ धावांवर संपवला.
अँडरसन फिलिप २४ धावांवर नाबाद राहिला. यापूर्वी, जॉन कॅम्पबेल १०, तेजनारायण चंद्रपॉल ३४ आणि अलिक अथनाझे ४१ धावा करून बाद झाले होते. कर्णधार रोस्टन चेस याला खातेही उघडता आले नाही. भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवव्यतिरिक्त रवींद्र जडेजाने तीन बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.