

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India vs Shri Lanka Series : बीसीसीआयने शनिवारी भारताच्या श्रीलंका दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल जाहीर केला. यापूर्वी दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते मात्र दोन दिवसांनी त्यात बदल करण्यात आला आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ तीन टी-20 आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठीचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही.
भारतीय संघ या महिन्याच्या अखेरीस तीन टी-20 आंतरराष्ट्रीय आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. याआधीच्या वेळापत्रकानुसार पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 26 जुलैला होणार होता, मात्र आता तो 27 जुलैला होणार आहे. यानंतर 28 जुलै आणि 30 जुलै रोजी दोन टी-20 सामने खेळले जाणार आहेत. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सर्व सामने खेळवले जातील.
उभय संघांमध्ये एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यापूर्वी मालिकेतील पहिला सामना 1 ऑगस्टला खेळवला जाणार होता. पण त्यात बदल करण्यात आला आहे. यानंतर उर्वरित वनडे सामने 4 आणि 7 ऑगस्टला खेळवले जातील. सर्व एकदिवसीय सामने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-20 फॉरमॅटमधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे ते टी-20 संघात नसतील हे निश्चित आहे. पण एकदिवसीय आणि कसोटीत ते खेळत राहणार आहेत. त्यामुळे टी-20 मालिकेत जरी हे दोघे नसले तरी एकदिवसीय मालिकेसाठी ते उपलब्ध असतील की नाही हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. दरम्यान टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी मिळेल. झिम्बाब्वे दौ-यातील किती खेळाडूंना पुन्हा संघात स्थान मिळेल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांचे प्रशिक्षक बदलण्यात आले आहेत. गौतम गंभीर हे टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक बनले आहेत. तर श्रीलंका क्रिकेट संघात सनथ जयसूर्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
पहिला टी-20 सामना : 27 जुलै
दुसरा टी-20 सामना : 28 जुलै
तिसरा टी-20 सामना : 30 जुलै
टी-20 मालिका पल्लेकेले येथे खेळवली जाईल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील.
पहिली वनडे : 2 ऑगस्ट
दुसरी वनडे : 4 ऑगस्ट
तिसरी वनडे : 7 ऑगस्ट
वनडे मालिका कोलंबोमध्ये खेळवली जाईल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होतील.