IND vs SA : भारतासाठी आज करा किंवा मरा, आफ्रिकाविरूद्ध तिसरा टी-20 सामना

IND vs SA : भारतासाठी आज करा किंवा मरा, आफ्रिकाविरूद्ध तिसरा टी-20 सामना
Published on
Updated on

जोहान्सबर्ग, वृत्तसंस्था : भारत व दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तिसरी व शेवटची टी-20 आज खेळवली जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ 0-1 फरकाने पिछाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला तर दुसर्‍या लढतीत दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमानुसार बाजी मारली. पहिल्या दोन्ही सामन्यांत पावसाचा व्यत्यय आल्याने किमान जोहान्सबर्गमध्ये तरी पूर्ण 20 षटकांचा सामना व्हावा, अशी चाहत्यांची अपेक्षा असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 8.30 वाजता या लढतीला प्रारंभ होईल.

वांडरर्सवरील या लढतीसाठी दोन्ही संघ पूर्ण ताकदीने उतरणार नाहीत, असे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंनी या मालिकेतून माघार घेतली आहे तर दक्षिण आफ्रिकेनेही आता मार्को जॉन्सन व गेराल्ड कोएत्झे यांना कसोटीच्या तयारीसाठी संघातून मुक्त केले आहे. हे दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेच्या तयारीसाठी स्थानिक प्रथमश्रेणी चार दिवसीय सामन्यात खेळणार आहेत.

या मालिकेत दोन्ही संघांतील मध्यमगती गोलंदाज झगडत आले असून येथे तरी त्यांना सूर सापडणार का, याची उत्सुकता असणार आहे. जोहान्सबर्गमध्ये फिरकीला फारशी साथ असणार नाही, हे जवळपास स्पष्ट मानले जाते. यजमान संघासाठी हेन्ड्रिक्सचा फॉर्म महत्त्वाचा ठरू शकतो. त्याने मागील 12 सामन्यांमध्ये 51.50 अशी लक्षवेधी सरासरी नोंदवली आहे. भारतीय संघातर्फे सूर्यकुमार यादव व रिंकू यांनी मधल्या फळीत दमदार प्रदर्शन साकारले आहे. या तिन्ही खेळाडूंना आगामी विश्वचषक स्पर्धेची तयारी खुणावत असेल, हे साहजिक आहे. मात्र, स्वत: सूर्यकुमार यादव हे मान्य करत नाही. तूर्तास, एकावेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करणे, यावरच माझा भर आहे, असे सूर्यकुमार याबाबत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला.

यापूर्वी, मंगळवारी झालेल्या दुसर्‍या टी-20 लढतीत मॅथ्यू ब्रीतझ्कीने अवघ्या 7 चेंडूंत 16 धावा केल्या. मात्र, अस्तित्वात नसलेली दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. आश्वासक प्रारंभानंतर अचानक बाद व्हावे लागल्याने त्याची निराशा झाली. आता त्या अपयशाची भरपाई करण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे.

भारतीय संघातर्फे यशस्वी जैस्वालला पहिल्या सामन्यात तीन चेंडूंतच परतावे लागले. पण, येथे आपली उपयुक्तता सिद्ध करण्याचे त्याचेही लक्ष्य असेल. आतापर्यंत खेळलेल्या 14 सामन्यांत त्याचा स्ट्राईक रेट 161.57 इतका लक्षवेधी राहिला आहे.

संघ यातून निवडणार (IND vs SA)

भारत : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीट्जके, नांद्रे बर्गर, जेराल्ड कोएत्जी, डोनोवन फरेरा, रिझा हेंड्रिक्स, मार्को जान्सेन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुक्वायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिझाद विलियम्स, ब्यूरन हेंड्रिक्स.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news